minister jankar satara | Sarkarnama

मंत्री जानकर साताऱ्याकडे लक्ष कधी देणार ? 

उमेश बांबरे 
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

शेखर गोरेंचे पक्षांतर! 
माणचे नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादीत उडी मारल्यानंतर तालुक्‍यातील रासप विस्कळीत आहे. दीड दोन वर्षात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिवसेना, कॉंग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनीही आतापासूनच पेरणी सुरू केली आहे. या सर्व नेत्यांत माणचे स्थानिक असलेले मंत्री महादेव जानकर हे कुठेच दिसत नसल्याने ते साताऱ्याकडे कधी लक्ष देणार, हा प्रश्‍न सद्या चर्चिला जात आहे. 

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्सविकास मंत्री महादेव जानकर गेल्या वर्षभरापासून सातारा जिल्ह्याच्या संपर्क क्षेत्रापासून बाजूला गेल्याचे चित्र आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर पक्षाच्या बांधणीत आणि जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. मात्र तसे प्रत्यक्षात काही घडलेले नाही. 

फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्याकडे जबाबदारी दिली गेली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ते कृषी व पणन राज्यमंत्री झाले. त्यासोबतच पालकमंत्री शिवतारेंना मदत म्हणून सदाभाऊंकडे साताऱ्याचे सहपालकमंत्रीपद आले. सदाभाऊंबरोबरच मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले होते. या तीन मंत्र्यांपैकी श्री. शिवतारे, सदाभाऊंनी जिल्ह्याच्या कारभारात लक्ष घातले.

सदाभाऊंनी तर आगामी माढा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत करत माण, खटाव तालुक्‍यात संपर्क मोहिम कायम ठेवली आहे. पण मुळचे माण तालुक्‍यातील असूनही रासपचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर मात्र, जिल्ह्याच्या संपर्कापासून थोडे दूरच राहिल्याचे चित्र आहे. अलिकडच्या काळात ते नियोजन समितीच्या बैठकींनाही उपस्थित राहात नाहीत. मागे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते फलटण व माण तालुक्‍यात आले असता त्यांनी आता रासपच्या बांधणीत आणि सातारा जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालण्याचे सुतोवाच केले होते. त्याचंया या भुमिकेमुळे जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यादृष्टीने ठोस असे काही घडले नाही. 

 

संबंधित लेख