Minister Girish Mahajan Says He is an Actor | Sarkarnama

गिरीष महाजन म्हणतात; मी चालता बोलता कलाकार, दिवसात अनेक भूमिका बजावतो 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या नुतनीकरण केलेल्या महाकवी कालिदास नाट्यगृहाचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शहरातील तिन्ही आमदारांचा नामोल्लेख करीत त्यांनी "चांगली भूमिका करा. तरच तुमचे प्रमोशन होईल. अन्यथा भविष्यात काही खरे नाही,'' या शब्दात कान टोचले.

नाशिक : "शालेय जीवनापासून नाटकांत भूमिका करत आलो आहे. आजही तेच करावे लागते. त्यामुळे मी चालता बोलता कलाकार आहे. दिसायला बरा असल्याने स्त्रीपात्राची गरज पडली की हमखास माझ्याच वाट्याला ती येत असे. आजही दिवसभरात अनेक भूमिका पार पाडत असतो. भूमिका चांगली करतो म्हणुनच तर टिकून आहे.'' या शब्दात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या अभिनयाचा पैलु उलगडुन दाखविला. 

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या नुतनीकरण केलेल्या महाकवी कालिदास नाट्यगृहाचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शहरातील तिन्ही आमदारांचा नामोल्लेख करीत त्यांनी "चांगली भूमिका करा. तरच तुमचे प्रमोशन होईल. अन्यथा भविष्यात काही खरे नाही,'' या शब्दात कान टोचले. यावेळी ते म्हणाले, "हे नाट्यगृह आहे. इथे कलाकार अभिनय करतात. राजकारण करतो म्हणजे आपण देखील काही वेगळे नाही. मला तर लहानपणापासून नाटकांत भूमिका करायचो. नववी, दहावीत दादाभाई नौरोजी यांसह विविध नाटकांत भूमिका केल्यात. दिसायला बरा असल्याने स्त्रीपात्र असले की शिक्षक हमखास मलाच संधी देत. महिनाभर सराव होत असे. डोक्‍यावर लांब केसांचे गंगावन परिधान करुन मी नाटकात अभिनय करायचो. अभिनयाच्या शिक्षणाचा आजही उपयोग होतो आहे." 

ते पुढे म्हणाले, "आज मी मंत्री आहे. त्यामुळे दिवसभरात एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. सत्काराला गेल्यावर ती व्यक्ती किती चागंली, दानशूर होती असे सांगावे लागते. त्यानंतर एखादा रुग्ण आयसीयू मध्ये असतो तिथे सांत्वनाला जावे लागते. एखाद्यासाठी पोलिस ठाण्यात जायची वेळ येते. विवाह समारंभात जातांना वर-वधुचे कौतुक करावे लागते. प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका असते. एका दिवसात किती भूमिका बदलतात. त्यामुळे मी तरी चालता बोलता कलाकारच आहे." यावेळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते संभाजी मोरुस्कर, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

 

संबंधित लेख