minister bapat upset on ceo rajesh deshmukh | Sarkarnama

ZP CEO राजेश देशमुखांवर मंत्री बापट नाराज! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्ह्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना दुर्गम भागात नियुक्‍त्या दिल्याने संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट हे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावर नाराज झाले आहेत. यासंदर्भाने शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. 

पुणे: आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्ह्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना दुर्गम भागात नियुक्‍त्या दिल्याने संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट हे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावर नाराज झाले आहेत. यासंदर्भाने शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. 

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर परजिल्ह्यातील शिक्षक सातारा जिल्हा परिषदेत आले. आजवर स्वत:च्या गावापासून दूर असल्याने आता सातारा जिल्हा परिषदेत आल्यावर शिक्षकांना त्यांच्या तालुक्‍यात गावाजवळ नियुक्‍ती मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी केल्या. मात्र त्यांना आश्‍वासनाशिवाय काही मिळाले नाही. 

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागात सुगम-दुर्गम शाळांचे प्रकरण सुरु आहे. दळणवळण, इतर सुविधांच्यादृष्टीने सुगम आणि दुर्गम असे शाळांचे वर्गिकरण करण्यात आले. या वर्गिकरणानंतर सुगम भागातील शिक्षकांची बदली दुर्गम भागात करण्याचा टप्पा होणार होता. या प्रक्रियेमुळे राजकारणात प्रभाव असणारे, तसेच शिक्षक संघटनांच्या राजकारणात अग्रभागी असलेले शिक्षक अस्वस्थ होते. कोणत्याही परिस्थितीत दुर्गम भागात जायचे नाही, अशी त्यांची मानसिकता होती. त्यामुळे अशा शिक्षकांच्या गटाने सातारा झेडपीपासून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या सचिवांपर्यंत फिल्डींग लावली होती. त्यांनी पदाधिकाऱ्यांसह, प्रशासनाला त्यांची सोयीची भूमिका घेण्यास राजी केले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात नियुक्‍ती द्यावी आणि त्यांचा मार्ग मोकळा करावा, असा पर्याय त्यांनी काढला. ही व्यूहरचना समजल्यानंतर बाहेरुन आलेल्या शिक्षकांनी विनवण्या केल्या, मात्र त्यांच्या हाती निराशा आली. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ज्यावेळी शिक्षकांना दुर्गम भागात नियुक्‍त्या दिल्या, त्यावेळी विशेषत: महिला शिक्षकांना रडू आवरता आले नाही. पाटण, जावली भागात ज्या ठिकाणी एसटी जात नाही, तिथे काही महिला शिक्षकांना नियुक्‍ती देण्यात आली आहे. कांदाटी खोऱ्यात, जिथे लॉंचने जावे लागते, तिथेही नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. ज्या शिक्षकांना गंभीर आजार झाले आहेत, त्यांचाही विचार झाला नाही. पती पत्नींचा विचार केला गेलेला नाही. पती एका तालुक्‍यात तर पत्नी 70 किलोमीटर दुसऱ्या तालुक्‍यात, अशा नियुक्‍त्या देण्यात आल्याने प्रचंड नाराजी आहे. 

हा विषय घेऊन भाजपचे कार्यकर्ते संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याकडे गेले. बापट हे सातारा भाजपचे संपर्कमंत्री असल्याने त्यांनी तातडीने याविषयात लक्ष घातले. हा विषय समजावून घेतल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्‍त केली. लगेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी पत्र दिले आहे. विशेष बाब म्हणून या शिक्षकांचा विचार करुन फेरनियुक्‍त्या देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

संबंधित लेख