Minister Babanrao Lonikar pressurised to contest Parbhani Loksabhaa ? | Sarkarnama

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पेचात : परभणी लोकसभा की परतूर विधानसभा ?

योगेश बरिदे
बुधवार, 7 मार्च 2018

 तीनवेळा परतूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे विद्यमान स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आगामी विधानसभा निवडणूक परतूर मधूनच लढवण्यास इच्छूक आहे. परंतु पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर परभणी लोकसभा लढवण्यासाठी दबाव असल्याचे बोलले जाते.

परतूर :  तीनवेळा परतूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे विद्यमान स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आगामी विधानसभा निवडणूक परतूर मधूनच लढवण्यास इच्छूक आहे. परंतु पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर परभणी लोकसभा लढवण्यासाठी दबाव असल्याचे बोलले जाते. राज्यात मंत्रीपद उपभोगलेल्या नेत्यांनी 2019 मध्ये विधानसभा न लढवता लोकसभा लढवावी असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोणीकरांचे मन जरी परतूरमध्ये असले तरी त्यांना पक्षाचा आदेश मानत लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असे दिसते. 

जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर 99-2004 आणि 2014 असे तीनवेळा निवडून  आले आहेत. मोदी लाटेमुळे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आली आणि लोणीकरांचे नशीब फळफळले.  सुरेश जेथलिया यांचा अवघ्या चार हजार 360 मतांनी पराभव केल्यानंतरही बनबराव लोणीकर यांचा राज्यमंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. जालन्याचे पालकमंत्रीपद आणि राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 

मंत्रीपदाच्या साडेतीन वर्षात लोणीकरांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाला झुकते माप दिले. त्यामुळे 111 गावांना जोडणारी वॉटर ग्रीड योजना, गावगावत 132 के.व्ही. उपकेंद्र, एमआयडीसी व मतदारसंघातील रस्त्यांसाठी 300 कोटींचा निधी, परतूर बसस्थानकाचे सुशोभिकरण, आष्टी येथे व्यापारी संकूल, पंढरपूर-शेगांव दिंडीमार्ग, 11 कोटींचे शहर अंतर्गत सिमेंट रस्ते, भूमिगत गटार योजना, परतूर-आष्टी रोडवर प्रस्तावित उड्डाणपूल, निम्न दुधना प्रकल्पासाठी भरघोस निधी त्यांनी मिळवला. 

एकंदरित विकासकामाचा आलेख पाहता बनबराव लोणीकर कुठे कमी पडले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांचे प्रगती पुस्तक उत्तम असले तरी त्यावर बोंडआळी नुकसनाग्रस्तांना अद्याप न मिळालेली आर्थिक मदत, दिंडी मार्गासाठी जमीनीचे भूसंपादन करूनही मावेजा न मिळने असा शेरा देखील आहे. ज्याचा फटका त्यांना निवडणूकीत काही प्रमाणात बसू शकतो. 

परतूर की परभणी? 

बनबराव लोणीकर यांना कुठल्याही परिस्थितीत परतूर विधानसभा मतदारसंघ सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे ते विधानसभेसाठीच आग्रही राहणार हे स्पष्ट आहे. पण 2019 मध्ये  भाजपकडून राज्यात मंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांना लोकसभा लढवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या दबावापुढे झुकावे लागले तरच बबनराव लोणीकर परभणी लोकसभेचा विचार करतील. तुर्तास परभणी लोकसभेसाठी त्यांनी पुत्र राहूल लोणीकर यांचे नाव पुढे केले आहे. 

बबनराव लोणीकर यांचा तीनवेळा आमदार आणि आता साडेतीन वर्षाच्या मंत्रीपदाचा अनुभव पाहता त्यांना लोकसभा लढवण्यावाचून पर्याय राहणार नाही असे दिसते. त्यामुळे परतूरमधून राहूल लोणीकर यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. राहूल लोणीकर यांचे युवा नेतृत्व सध्या मतदारसंघात बहरत आहे. पंचायत समिती सदस्य, सभापती, उसभापती, जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्षपद भूषवलेले राहूल लोणीकर परतूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक देखील आहेत. 

भाजपला शिवसेना, कॉंग्रेसचे आव्हान 

परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपपुढे शिवसेना, कॉंग्रेसचे प्रमुख आव्हान असणार आहे. 2014 मध्ये बबनराव लोणीकर अवघ्या चार हजार मतांनी निवडून  आले होते. शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फटका शिवसेना उमेदवारामुळे लोणीकरांना बसला होता. पण मोदी लाटेने त्यांना तारले होते . 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे. त्यामुळे लोणीकरांच्या विरुध्द दंड थोपटणाऱ्यांची शिवसेनेकडे गर्दी झाली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हासंघटक मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख माधव कदम हे विधानसभा लढवण्यास इच्छूक आहे. यापैकी कुणाची वर्णी लागते यावर लढत कशी होणार हे अंवलबून असेल. 

तिकडे गेल्यावेळी थोडक्‍यात हुकलेला विजय मिळवण्यासाठी कॉंग्रेस देखील जोर लावणार आहे. सध्यातरी कॉंग्रेसकडून माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे. माजी आमदार कदीर देशमुख यांचे पुत्र अन्वर देशमुख, माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे पुत्र राजेश राठोड यांची नावे पुढे येत आहेत. 

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे यावेळी परतूर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात हे विधानसभा लढवण्यास इच्छूक आहेत. आजोबा माजी आमदार वैजनाथराव आकात, वडील दिवंगत बाबासाहेब आकात यांचा राजकीय वारसा आणि  शैक्षणिक संस्थांचे जाळे या जोरावर आपण विजयी होऊ असा त्यांचा दावा आहे . 2014 मध्ये मनसेकडून विधानसभा लढलेल्या बाबासाहेब आकात यांनी 38 हजार 750 एवढी लक्षवेधी मते घेतली होती. 

जनसंपर्क हीच लोणीकरांची ताकद 

दोन लाख 25 हजार मतदार असलेल्या परतूर विधानसभा मतदारसंघात बबनराव लोणीकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. बंजारा, धनगर, माळी, लिंगायत समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या समाजाला प्रतिनिधित्व देत लोणीकर यांनी मतदारसंघात समतोल राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे लोणीकरांच्या विजयात या समाजाचा वाटा नेहमीच महत्वाचा ठरला आहे. बबनराव लोणीकरांना पक्षाच्या आदेशानूसार परभणी लोकसभा लढवावी लागली तर त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे आणि संपर्क या जोरावर त्यांचे पुत्र राहूल लोणीकर बाजी मारतील अशी चर्चा आहे.

संबंधित लेख