minisher subhash deshmukh interview | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने डब्यात घातलेल्या महामंडळाला सुभाषबापूंनी दिली संजीवनी! 

संपत मोरे 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

मी संस्था सुरु करणारा माणूस आहे. संस्था बंद करणं माझ्या रक्तात नाही. आम्ही महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा निर्णय घेणार आहोत. खेडयातील लोकांचा बॅंकेशी कमी संबंध येतो. त्यांच जास्तीत जास्त संबंध पतसंस्थेशी येतो. पतसंस्थेत बुडलेल्या ठेवींना कसलेही संरक्षण नसते. त्यामुळे अशा ठेवींसाठी ठेव सुरक्षा योजना राबवून ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा विचार आहे.

- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

पुणे : "कोणाला विचारून पैसे ठेवले ? असा प्रश्न आता ठेवीदारांना विचारला जाणार नाही. पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी ठेव सुरक्षा योजना लवकरच अंमलात आणली जाणार आहे', असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळ 2006 पासून बंद अवस्थेत आहे. या महामंडळाला संजीवनी देण्यासाठी देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ते म्हणाले, 2000 साली स्थापन झालेले महामंडळ 2006 पासून बंद अवस्थेत होते. रिझर्व्ह बॅंकेने या महामंडळाचा परवाना रद्द केला होता. या संस्थेकडे कोणाचे लक्ष नव्हते. सहकारी चळवळीचा वारसा सांगणारे लोक तेव्हा सत्तेत होते, पण त्यांना हे महामंडळ सुरु करावे, असे वाटले नाही. महामंडळाचे 2006 पासूनचे लेखापरीक्षणही झालेले नव्हते. एवढी उदासीनता दाखवली गेली. या खात्याचा चार्ज घेतल्यावर अधिकारी महामंडळाबद्दल उदासीन असल्याचे जाणवले. पण मी ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची ठरणारी हि संस्था वाचवण्याचा निर्धार केला आणि कामाला लागलो. 

"मिटकॉन'सारख्या संस्था ज्या पद्धतीनं काम करतात, तसं काम सहकारी महामंडळामार्फत करण्याचा मानस आहे. आज अनेक सहकारी संस्था आपापल्या गावात काही उत्पादने तयार करत आहेत, पण त्यांना बाजारपेठ मिळत नाही. काही दिवस त्या संस्था काम करतात पण बाजारपेठेअभावी त्यांचे काम बंद होते. त्यांची उमेद खचते. अशा प्रयोगशील संस्थांच्यासाठी कायमस्वरूपी विक्रीव्यवस्था करून या संस्थांना बळ देण्याचा प्रयत्न आहे. संस्थांना प्रशिक्षण देण्यासोबत नवीन सहकारी संस्थांना उभारणीसाठी चालना देण्यासाठी महामंडळ काम करेल. बंद पडलेलं महामंडळ सुरु करून ते गतिमान करून चालवण्याचं मोठं आव्हान आहे पण राज्यातील एका लाख साठ हजार संस्थांच्या पाठबळावर आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलवण्याचा संकल्प केला आहे, असे देशमुख म्हणाले. 

संबंधित लेख