MIM office bearer fight for what reason ? | Sarkarnama

एमआयएमच्या पदाधिकाऱ्यात सर्वाधिक भांडणे कशासाठी  होतात?

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

खासदार असदोद्दीन ओवेसी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून किमान दोन खासदार निवडून पाठवण्यासाठी प्रत्येकाने झपाट्याने कामाला लागंल पाहिजे.

-आमदार इम्तियाज जलील

 

औरंगाबाद:  " छोट्या मोठ्या तक्रारी प्रत्येक राजकीय पक्षात असतात, त्या विसरून जा. पण महाराष्ट्रात सर्वाधिक भांडण एमआयएमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कशासाठी होत असतील तर ती डिजीटल बोर्डवरच्या फोटोवरून होतात ,"असा गौप्यस्फोट एमआयएमचे राज्यातील नेते आमदार इम्तियाज जलील यांनी हैदराबादेत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत  केला . 

दोन दिवसीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील 112 नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हैदराबादेत दाखल झाले आहेत. या सर्वांना मार्गदर्शन करतांना इम्तियाज जलील म्हणाले,  "लोक तुम्हाला फोटोमुळे नाही तर तुम्ही केलेल्या कामांमुळे ओळखतात एमआयएममुळे आपली ओळख आहे हे कुणीही विसरू नये. पक्षाची ध्येय धोरण आणि वाटचाल समजून घेऊन प्रत्येकाने इतके काम केले पाहिजे की उद्या उमेदवारी देतांना पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध राहतील. औरंगाबादेत माझ्यापेक्षाही एखादा नगरसेवक, पदाधिकारी काम करत असेल तर पक्षाच्या नेत्यांना उद्या विधानसभेची उमेदवारी देतांना विचार करावा लागला पाहिजे. "

श्री . जलील पुढे म्हणाले," महाराष्ट्रात एमआयएमची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. आज आपले दोन आमदार आहेत, भविष्यात ही संख्या निश्‍चित वाढेल. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातून आगामी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत किमान दोन एमआयएमचे खासदार निवडून  आणण्यासाठी कामाला लागा. एमआयएम हैदराबादमध्ये जे सामाजिक काम करते त्याच्या 20 टक्के तरी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी करून दाखवावे असे आव्हान मी वेळोवेळी देतो. तसे झाले तर मी माझी मिशी देखील काढायला तयार आहे, पण ते कोणत्याच राजकीय पक्षाला शक्‍य नाही. "

" आगामी काळात महाराष्ट्रात देखील आम्हाला हे काम करायचे आहे. त्या जोरावरच आपल्या 112 नगरसेवकांची संख्या तीनशेवर आपण नेऊ शकतो. सध्या राज्यात मी आणि वारिस पठाण दोघेच आमदार आहोत. आगामी काळात ही संख्या देखील वाढायला हवी. लोकसभेत देखील एमआयएमच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे. खासदार असदोद्दीन ओवेसी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून किमान दोन खासदार निवडूण पाठवण्यासाठी प्रत्येकाने झपाट्याने कामाला लागंल पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले .  

 

संबंधित लेख