MIM MLA Imtiaz Jaleel starts social engineering | Sarkarnama

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने एमआयएमचे सोशल इंजिनिअरिंग 

जगदीश पानसरे 
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद शहरातील पूर्व , पश्चिम आणि मध्य या तीनही विधानसभा मतदार संघात हे सोशल इंजिनिअरिंग खूप परिणामकारक आणि निर्णायक ठरू शकते .

औरंगाबादः    एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद लेणी परिसरात उपस्थित राहून दलित बांधवांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डोक्‍यावर निळा फेटा बांधून त्यांनी उपस्थितांना अभिवादनही केले.

 वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची संयुक्त जाहीर सभा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने चालून आलेली ही सोशल इंजिनिअरिंगची संधी एमआयएमने साधल्याचे बोलले जाते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरूवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद लेणी परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी आवर्जून हजेरी लावली होती. 

औरंगाबाद शहरातील पूर्व , पश्चिम आणि मध्य या तीनही विधानसभा मतदार संघात हे सोशल इंजिनिअरिंग खूप परिणामकारक आणि निर्णायक ठरू शकते . या तीन विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार एकत्र झाले तर ते विजयाकडे नेणारे समीकरण ठरू शकते . 

भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड . प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असॊदोद्दीन ओवैसी या दोघांनी हेच ध्यानात घेऊन औरंगाबादवर भर दिलेला दिसत आहे . आमदार इम्तियाज जलील हे जलद डावपेचांची आखणी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध आहेत . तर गफ्फार कादरी यांना आमदार अतुल सावेंकडून गेल्यावेळी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता .  हे दोघेही आंबेडकर - ओवैसी यांनी तयार केलेल्या आघाडीला औरंगाबाद शहरात भक्कम स्वरूप यावे म्हणून कामाला  लागलेले आहेत . 

राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन केली. एमआयएमने देखील या आघाडीत सामील होत आपला पाठिंबा दर्शवला. 

आता या आघाडीच्या माध्यमातून दलित-मुस्लिमांची व्होट बॅंक मजबुत करण्यावर दोन्ही पक्षांनी भर दिला आहे. एमआयएमने देखील यावर सोशल इंजिनिअरिंग सुरू केले आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची 2 ऑक्‍टोबर रोजी शहरात संयुक्त जाहीर सभा झाली. मराठवाड्यातील या पहिल्याच रेकॉर्डब्रेक सभेने सत्ताधारी भाजप-सेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना चांगलीच धडकी भरली होती. 

परिवर्तनाची सुरूवात म्हणून या सभेकडे पाहिले गेले. त्यामुळे प्रकाश आबंडेकर, असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून हा उत्साह आणि ताकद मतदानापर्यंत कायम ठेवा असे आवाहन उपस्थितांना केले होते. हे आवाहन करतांनाच सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत दलित आणि मुस्लिम समाजाला एकत्रित आणण्याचे प्रयत्न एमआयएमकडून सुरू असल्याचे धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात दिसून आले. 

संबंधित लेख