"एमआयएम' महाराष्ट्रात लोकसभेच्या बारा जागा लढवणार

"एमआयएम' महाराष्ट्रात लोकसभेच्या बारा जागा लढवणार

औरंगाबाद : "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन' अर्थात एमआयएम आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 12 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे कळते. सध्या लोकसभेत एमआयएमचा एकमेव खासदार म्हणजे असदोद्दीन ओवेसी यांच्या रुपाने प्रतिनिधित्व करत आहे. परंतु राज्यात पक्षाचा झालेला विस्तार आणि वाढती ताकद पाहता बारा लोकसभा मतदारसंघात एमआयएम आपले उमेदवार उतरवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुस्लिम वोट बॅंकेवर डोळा ठेवून असलेल्या इतर राजकीय पक्षांचे मात्र बारा वाजणार अशीच शक्‍यता आहे. 

हैदराबादमधून देशाच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या एमआयएमने अल्पावधीत महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत एमआयमचे वारीस पठाण भायखाळा तर इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणूकीत 24 नगरसेवक निवडून आणत एमआयएमने आपली ताकद दाखवून दिली होती. 

याशिवाय गेल्या वर्षभरात झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएमचे 112 सदस्य निवडून आले. स्वांतत्र्य काळापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेल्या मुस्लिम वोट बॅंकेला सुरुंग लावण्याचे काम राज्यात एमआयएमने केले. त्यामुळे एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून देखील हिणवले जाते. मात्र याकडे फारसे लक्ष न देता येत्या लोकसभा निवडणुकीत 12 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची जोरदार तयारी एमआयएमच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची चर्चा आहे. 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील महत्वाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची महत्वपुर्ण बैठक हैदराबादेत पार पडली. या बैठकीत आगामी काळातील रणनिती आणि कुठल्या मतदारसंघातून लढायचे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या ओवेसी बंधूंनी आपले सगळे लक्ष तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केले असले तरी या निवडणुका होताच हे दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची यावर चर्चा केली जाणार आहे. 

या संदर्भात एमआयएमचे आमदार व महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्रात पक्षाची ताकद निश्‍चितच वाढली आहे, त्यामुळे एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. या भावना आम्ही असदोद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम आपले उमेदवार देणार एवढे तर निश्‍चित आहे. पण किती जागा लढवणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

औरंगाबादची जागा लढवणार का? या प्रश्‍नावर बोलतांना ते म्हणाले, इथून एमआयएमने लढावे ही कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. शिवाय हैदराबाद नंतर जर पक्षाची सर्वाधिक ताकद महाराष्ट्रात कुठे असेल तर ती औरंगाबादमध्ये. महापालिकेत आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत, आमचे 24 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मी स्वतः आमदार आहे. त्यामुळे औरंगाबादेतून निवडणूक लढवा अशी मागणी होणे सहाजिक आहे. परंतु याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी हेच घेतील. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com