हैदराबादमधील "शिकवणी' साठी एमआयएमचे नगरसेवक रवाना...

 हैदराबादमधील "शिकवणी' साठी एमआयएमचे नगरसेवक रवाना...

औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने औरंगाबाद महापालिकेत घातलेला गोंधळ, त्यावरून त्याला भाजप नगरसेवकांकडून झालेली मारहाण हे प्रकरण एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसे यांनी बरेच गांभीर्याने घेतले आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचे सभागृहात असेच वर्तन राहिले तर महाराष्ट्रातील एमआयएम सदस्यांची संख्या झपाट्याने खाली येईल. हा धोका ओळखून राज्यभरातील पक्षाच्या 112 नगरसेवक, सदस्यांचा "क्‍लास' घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दोन दिवसीय कार्यशाळेसाठी आज एमआयएमच्या नगरसेवकांची टूर हैदराबादच्या दिशेने निघाली. 

चार आणि पाच सप्टेंबर रोजी खासदार असदोद्दीन ओवेसी त्यांचे आमदार बंधू अकबरोद्दीन आणि पक्षाचे इतर आमदार यांच्या उपस्थितीत हैदराबादेत एमआयएमच्या नगरसेवकांसाठी कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून नगरसेवक हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. या कार्यशाळेचे जनक ठरलेले आणि सध्या एक वर्ष स्थानबध्दतेच्या कारवाईला तोंड देणारे औरंगाबाद येथील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन सध्या हर्सुल कारागृहात कैद आहेत. त्यांना वगळून महापालिकेतील 23 नगरसेवकांना घेऊन एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आज (ता. 3) दुपारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनहून रवाना झाले. 

एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने 16 ऑगस्ट रोजी औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली सभेला विरोध केला होता. या प्रकारावरून एमआयएमवर राज्य आणि देशभरातून टीकेची झोड उठली होती. यावर सय्यद मतीनची ही वैयक्तिक भूमिका आहे, एमआयएमचे त्याच्याशी काही देणेघेणे नाही असे सांगत एमआयएमने हात झटकले होते. या पार्श्‍वभूमीवर भविष्यात पुन्हा असा प्रसंग घडू नये, पक्षाचे धोरण, सुरू असलेले शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रमांची माहिती, पक्षशिस्तीचे धडे देण्यासाठी ओवेसी यांनी या खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आता दोन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर एमआयएम नगरसेवकांच्या वागणूकीत किती बदल होतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com