MIM Corporater banned | Sarkarnama

वाजपेयींना श्रद्धांजली नाकारणाऱ्या एमआयएम नगरसेवकावर बंदी 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

दरम्यान, दोन समाजात तेढ निर्माण करणे, दंग्याला चिथावणी देणे, व अश्‍लिल भाषा वापरणे या प्रकरणी नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजप संघटनमंत्र्यांची गाडी फोडल्या प्रकरणी बाळू वाघमारे यांच्या तक्रारीवरून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादः भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण केल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी संतप्त मागणी शिवसेना-भाजप नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली होती. त्यानूसार सय्यद मतीन यांना यापुढे एकाही सर्वसाधारण सभेत सभागृहात बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सय्यद मतीन यांना मारहाण झाल्यानंतर एमआयएम नगरसेवकांनी सभागृह सोडले होते. त्यानंतरही शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांच्या भावना तीव्र होत्या. अशा नगरसेवकाची सर्वसाधारण सभेत बसण्याची लायकी नाही, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली. 

देशात लोकशाही रुजविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या महान व्यक्तीचा मतीन यांनी अवमान केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत. मतीन यांचे वर्तन अक्षम्य असल्याचे स्पष्ट करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी मतीन यांना यापुढे एकाही सर्वसाधारण सभेला प्रवेश दिला जाऊ नये, असे आदेश दिले. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचेही महापौरांनी आदेशात नमूद केले आहे. 

मतीन यांचे वर्तन वादग्रस्तच 

मतीन यांच्या वागण्यावरून यापूर्वी अनेकवेळा सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला आहे. सभागृहात वंदे मातरम म्हणण्यास त्यांनी विरोध केला होता. सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिका उर्दूमधून काढण्यात याव्यात, महापालिका मुख्यालयावर उर्दूतून बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी करत मतीन यांनी स्वतःच बोर्ड लावला होता. त्यामुळे एमआयएम पक्षाने देखील अनेक वेळा त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी त्यांच्या गैरवर्तणूकीचा पाढा वाचला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख