MIM and Prakash Ambedkar may come together | Sarkarnama

'एमआयएम'चे ओवेसी व प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

प्रकाश आंबेडकर सध्या राज्यातील दलित, पिडीत, वंचितांच्या संघटनांसोबत चर्चा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी 'एमआयएम'सोबत राजकीय आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले होते.

नागपूर : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवेसी एकत्र निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक उत्तर दिले आहे. यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची शक्‍यता जवळपास मावळली आहे. प्रकाश आंबेडकर सध्या राज्यातील दलित, पिडीत, वंचितांच्या संघटनांसोबत चर्चा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी 'एमआयएम'सोबत राजकीय आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले होते.

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याला ओवेसी यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर आपला भक्कम विश्‍वास असून भाजप सरकार सध्या जाती व सांप्रदायिकेच्या नावावर देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. या राजकीय स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर हे प्रमुख भूमिका पार पाडू शकतील, असा मला विश्‍वास असल्याचे खासदार ओवेसी म्हटले आहे. 

'संपूर्ण दलित समाज, अल्पसंख्यांक व दुर्बल घटक त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे. काही पक्षांनी या समाजांचा केवळ पक्षाची 'व्होट बॅंक' म्हणून वापर केला आहे. या स्थितीमध्ये दलित, अल्पसंख्यांक व इतर मागासवर्गीयांमधील दुर्बल घटकांच्या मदतीने एक भक्कम राजकीय शक्ती स्थापन करण्याची आवश्‍यकता आहे. ज्या पक्षांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर विश्‍वास आहे व जो पक्ष त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करतो, त्या पक्षांसोबत राजकीय आघाडी करण्यास एमआयएम नेहमीच तयार आहे,' असे खासदार ओवेसी यांनी पत्रात नमूद केले आहे. 

संबंधित लेख