M.I.D.C. promotions being manipulated ! | Sarkarnama

एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या  पदोन्नतीत हेराफेरी !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 मे 2017

पात्र आणि योग्य उमेदवारांना डावलून काही ठराविक अधिकाऱ्यांची मोक्‍याच्या जागांवर वर्णी लावली जात असल्याचे सांगितले जाते. सेवाज्येष्ठता, जात पडताळणीकडेही कानाडोळा करून कार्यभाग साधत असल्याची चर्चा आहे. 

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) काही पदोन्नती नियम धाब्यावर बसवून केल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे. 
पात्र आणि योग्य उमेदवारांना डावलून काही ठराविक अधिकाऱ्यांची मोक्‍याच्या जागांवर वर्णी लावली जात असल्याचे सांगितले जाते. सेवाज्येष्ठता, जात पडताळणीकडेही कानाडोळा करून कार्यभाग साधत असल्याची चर्चा आहे. 

यापूर्वी पनवेल येथील तत्कालीन अधीक्षक अभियंत्याने जात चोरी करून पदोन्नती लाटली होती. त्याची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने संबधित अभियंत्याला बडतर्फ केले होते. या प्रकरणाचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच पुन्हा एमआयडीसी अधिकाऱ्यांची पदोन्नती केली जात असल्याचे सांगण्यात येते. याबाबत उद्योग विभागाने वेळीच हस्तक्षेप करून हा गैरव्यवहार थांबवावा, अशी अपेक्षा काही अधिकारी व्यक्‍त करीत आहेत.

पदोन्नती करताना नियमानुसार दावेदार अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे. त्यासाठी काहींनी जातीची खोटी प्रमाणपत्रे दिली असून, त्यांची जात पडताळणी योग्य प्रकारे झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे अधिकारी पदोन्नतीनंतरही एकाच विभागात ठाण मांडून आहेत. त्यांना मुंबई आणि कोकण विभाग सोडवत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत एमआयडीच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
 

संबंधित लेख