Mid day meal scheme to granted schools also | Sarkarnama

अनुदानित शाळेतील दीड लाख मुलांना शालेय पोषणचा लाभ : जीआर काढण्यासाठी हालचाली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

आमदार नागो गाणार, माजी आमदार रामनाथ मोते यांनी मागील काही वर्षांपासून सरकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांना शालेय पोषण आहार आणि मोफत पाठ्यपुस्तके देण्याची मागणी लावून धरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मागील सरकारने निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थी मात्र या लाभापासून वंचित राहिले होते.

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या व 20 टक्‍के अनुदानावर आलेल्या 1 हजार 678 शाळा आणि त्यासोबतच या शाळांतील 1 हजार 937 तुकड्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे दीड लाख मुलांना लवकरच शालेय पोषण आहारासोबत मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे.

या मुलांना सरकारने शिक्षण हक्‍क अधिकार कायद्यातील तरतुदींप्रमाणे शालेय पोषणचा लाभ द्यावा, त्यांना पाठ्यपुस्तके मोफत द्यावी, यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात आज मंत्रालयात शिक्षण सहसचिव व इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत यासाठीचा जीआर दोन दिवसांत काढला जाणार असल्याचे स्पष्ट आश्‍वासन आमदार गाणार यांना देण्यात आले असल्याने याचा लाभ राज्यातील दीड लाखांच्या दरम्यान गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार आहे.

आमदार नागो गाणार, माजी आमदार रामनाथ मोते यांनी मागील काही वर्षांपासून सरकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांना शालेय पोषण आहार आणि मोफत पाठ्यपुस्तके देण्याची मागणी लावून धरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मागील सरकारने निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थी मात्र या लाभापासून वंचित राहिले होते. त्यासाठी आमदार गाणार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाला असून यामुळे राज्यात सध्या 20 टक्‍के अनुदानास प्राप्त ठरलेल्या राज्यातील 1 हजार 678 शाळा आणि त्यासोबतच या शाळांतील 1 हजार 937 तुकड्यांमध्ये शिकत असलेल्या मुलांना शालेय पोषण आहार आणि मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर याचा जीआर येत्या दोन दिवसात काढण्याचे आश्‍वासन शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी दिले असल्याची माहिती आमदार गाणार यांनी दिली. खरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे प्रमुख रविंद्र फडणवीस आणि शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख