metro rail | Sarkarnama

कामे अपुरी असतानाही मेट्रोची ट्रायल घेण्याची घाई

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

जवळपास 38 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग अद्यापही पूर्ण झालेले नाही. मेट्रोचे एकही स्टेशन पूर्ण झालेले नाही. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या मुख्यालयाचे कामही धिम्यागतीने सुरू आहे. 

नागपूर : बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोची स्वातंत्र्यदिनी ट्रायल होणार आहे. यासाठी तीन कोच नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी ढोलताशामध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मेट्रोसाठी आवश्‍यक मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नसताना 15 ऑगस्टला मेट्रोची ट्रायल घेण्याची घाई कशासाठी असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेचे जोरात काम सुरू आहे. सध्या नागपुरात मेट्रोसाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु मेट्रो चालविण्यासाठी आवश्‍यक सोईसुविधा मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. अद्याप एकाही स्टेशनचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. वेळेवर मेट्रो सुरू करण्यात आली, हे दाखविण्यासाठी आता नागपूर मेट्रोची चढाओढ सुरू झालेली आहे. 

यासाठी घाईघाईने हैदराबादहून 3 कोच नागपुरात आणण्यात आले. कोरियन बनावटीचे हे कोच हैदराबाद येथे असेम्बल करण्यात आले आहेत. हे तिन्ही कोच नागपुरात आणण्यात आले तेव्हा ढोलताश्‍यांमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या तीन कोचची ट्रायल विमानतळ ते खापरीपर्यंत घेण्यात येणार आहे. 

जवळपास 38 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग अद्यापही पूर्ण झालेले नाही. मेट्रोचे एकही स्टेशन पूर्ण झालेले नाही. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या मुख्यालयाचे कामही धिम्यागतीने सुरू आहे. 

मेट्रोच्या मुख्यालयाचे काम डिसेंबर 2016 मध्ये पूर्ण करावयाचे होते. ही मुदत संपून आठ महिने उलटल्यानंतरही या मुख्यालयाचे काम पूर्णत्वास आलेले नाही.

मेट्रोच्या सध्याच्या कामाच्या गतीने रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. 2019 मध्ये नागपूर मेट्रो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु 38 किलोमीटरमध्ये पिलर्स उभारणे, त्यावर गर्डर टाकणे तसेच तेथे रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अद्यापही बाकी आहे. तरीही मेट्रोच्या ट्रायलसाठी घाई सुरू झालेली आहे. 

संबंधित लेख