मेट्रो पुणे जिल्ह्यातही जाणार, पण दुसऱ्या टप्यात 

मेट्रो पुणे जिल्ह्यातही जाणार, पण दुसऱ्या टप्यात 

पिंपरीः पहिल्या टप्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या फक्त वीस टक्के भागात धावणारी मेट्रो ही दुसऱ्या टप्यात,मात्र शहरातच नव्हे,तर शहराबाहेर जिल्ह्यातही जाणार आहे.

एमआयडीसी असलेल्या चाकणपर्यंत तिचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यात पश्‍चिम टोकाला निगडी आणि शहराच्या उत्तर टोक असलेल्या मोशीच्या पलीकडे हद्दीबाहेर चाकणपर्यंत जाणार आहे. 

शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा पाटील आणि भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे यांच्यासह इतरांनीही ही मागणी लावून धरली होती. त्यातही मेट्रोचा विस्तार हा नाशिकफाटा, भोसरी, मोशीमार्गे चाकणपर्यंत करा, असा आग्रह आमदार,खासदार अशा दोन्ही दादांचा होता. 

सध्या मेट्रोच्या दोन मार्गांचे काम सुरू आहे. त्यात पिंपरी ते स्वारगेट या मार्गाचे काम जोरात आहे. मात्र, हा मार्ग शहराचा फक्त वीस टक्के भाग कव्हर करतो आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार पहिल्या टप्यातच दुसऱ्या टोकापर्यंत पश्‍चिमेला निगडीपर्यंत करा, अशी मागणी लोकप्रतिनिधीच नव्हे, तर शहराच्या सर्व स्तरातून करण्यात आली होती.

पीएमपीप्रमाणे मेट्रोतही शहराला डावलले आणि सापत्नभावाची वागणूक दिल्याची शहरवासियांची भावना आहे. त्यातूनच हा विस्तार निगडी व चाकणपर्यंत करण्याची ही मागणी पुढे आली. ती हे काम करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही मान्य केली. त्यांनी यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम एका संस्थेला दिले आहे. आठ महिन्यात हा डीपीआर तयार करण्यास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बजावले आहे. 

दरम्यान, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचेही रुंदीकरण होणार आहे. सध्या चारपदरी असलेला हा हायवे सहापदरी केला जाणार आहे. त्यासाठीही दोन्ही दादांनी पाठपुरावा केलेला आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामातच मेट्रोसाठी जागा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचा पहिल्या टप्यातील मार्ग हा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून (उन्नत)जात आहे. तसाच तो दुसऱ्या टप्यातील नाशिकफाटा ते चाकण या विस्तारातही तो महामार्गावरूनच (पुणे-नाशिक) जाणाराच असणार आहे. 

त्याच्या "डीपीआर'तीन कोटी 85 लाख रुपये (जीएसटी मिळून चार कोटी 31 लाख) खर्च येणार आहे. तो पिंपरी पालिका करणार आहे. तसेच त्यासाठी निविदा न काढता हे काम थेट पद्धतीने मेट्रो कंपनीच्या सल्याने देण्यात आले आहे.

डीपीआर नव्हे,तर मेट्रोच्या विस्तार खर्चातही वाटा उचलण्याची तयारी श्रीमंत पिंपरी पालिकेने दर्शविली आहे. त्यामुळे त्याचा फायदा उत्तर पुणे जिल्ह्यातील रहिवाशांनाही होणार आहे. त्यांना एसटीच्या जोडीने गारेगार मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी त्यांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com