Metro Construction in Mumbai | Sarkarnama

मेट्रोच्या गोंधळाने फुले-बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथांचे काम रखडणार

संजीव भागवत
शनिवार, 29 एप्रिल 2017

या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घातले नाही तर त्याचे परिणाम तीनही महापुरूषांच्या ग्रंथ प्रकाशन आणि संशोधनाच्या कामावर पडणार आहे - प्रा. हरी नरके

मुंबई -  मंत्रालयाच्या समोर होत असलेल्या मेट्रो स्थानकाच्या बांधकामामुळे फुले-शाहू-आंबेडकर या तीनही महापुरूषांच्या चरित्र आणि संशोधन समितीच्या कार्यालयाचेही स्थलांतर झाल्याने या महापुरूषांच्या ग्रंथ प्रकाशन, संशोधनाचे काम रखडणार आहे. लवकरच येण्याच्या मार्गावर असलेल्या महात्मा फुले यांच्या समग्र वाड्‌मयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी खंडाचे मराठी अनुवादही यामुळे रखडणार आहेत.

मंत्रालयासमोरील गांधी भवनच्या मागे असलेल्या बॅरेक-18 मधील समितीच्या कार्यालयाचे स्थलांतर बेलॉर्ड पिअर येथील ठाकरसी इमारतीच्या दुस-या मजल्यावर करण्यात असून अत्यंत कमी जागा देण्यात आल्याने असंख्य जुने दस्तावेज, कामदपत्रे, संदर्भग्रंथ, इतर साहित्य ठेवण्याचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तीनही समितीच्या अध्यक्ष, कर्मचा-यांनी कसे बसायचे आणि समितीचे काम कसे करायचे असा गंभीर प्रश्‍न उभा टाकला आहे.

मंत्रालयासमोरील बॅरेक-18 मधील तीन समितीच्या कामकाजासाठी एक हजार चौरस फुटाची जागा होती. या जागेपैकी 700 चौरस फुटांमध्ये महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे जुने दस्तावेज, पुस्तके, संदर्भ ग्रंथ ठेवले जात होते. त्यामुळे उर्वरित 300 चौरस फुटांमध्ये आमचे कर्मचारी आणि तीन समित्यांचे तीन सदस्य सचिव बसत असत. यात प्रा. हरी नरके, प्रा. अविनाश डोळस आणि रमेश जाधव या तीन सदस्य सचिवांचा समावेश होता.

आता तीन समितीच्या सदस्य सचिवांसोबतच कर्मचारी आदींना बसण्यासाठी आणि तीनही महापुरूषांचे दस्तावेज, पुस्तके, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ आदी सर्व साहित्य ठेवण्यासाठी मेट्रोकडून केवळ 300 चौरस फुटांची जागा देण्यात आली आहे. या अपु-या जागेमुळे तीनही समित्यांच्या पुस्तक, दस्तावेजाचे अगदी छतापर्यंत ढीग लागले असून कर्मचारी व समितीचे सदस्य सचिव आणि इतरांना बसण्याचीही मोठी पंचाईत मेट्रोने केली आहे. अनेकांना तर या स्थितीत उभे राहूनही काम करता येणार नसल्याचे चित्र बेलॉर्ड पिअरच्या ठाकरसी इमारतीत तीन समित्यांसाठी दिलेल्या कार्यालयात निर्माण झाले आहे.

या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घातले नाही तर त्याचे परिणाम तीनही महापुरूषांच्या ग्रंथ प्रकाशन आणि संशोधनाच्या कामावर पडणार असल्याचे महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. हरी नरके यांनी दिली.

समितीच्या नव्या कार्यालयातील अडचणीमुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन खंड येणे आणि उरलेल्या नव्या आवृत्तीच्या पुस्तकांचे काम पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यासोबतच बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी भाषेतील खंडाचे मराठी भाषांतर येणे हे सगळे काम थांबणार आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्या समग्र वाड्‌मयाचे काम अगदी अंतिम टप्प्यात होते, परंतु आता कार्यालय स्थलांतर झाल्यानंतर ते अशा प्रकारचे कमी आणि अडचणीचे झाल्याने महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील चरित्र ग्रंथ, नवीन खंड, साहित्याच्या कामावर मोठा परिणाम होणार असल्याचेही प्रा. नरके यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

आमची जागा मोजून घेउन तितकीच जागा आणि आमच्याकडे असलेल्या रेकॉर्ड, पुस्तकांसाठी कपाट, फर्निचरही मेट्रोकडून देण्याचे कबूल करण्यात आले होते, मात्र तसे काही झाले नाही, जी जागा देण्यात आली तिथे पुस्तके आणि ग्रंथांने भरून गेल्याने उभे राहण्याचीही जागा उरली नाही, यामुळे ग्रंथ प्रकाशन, संशोधनाचे काम अडचणीत सापडले असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

 

संबंधित लेख