Meghna Bordikar : I have faith in CM | Sarkarnama

 मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास, युतीचा धर्म पाळणार :  मेघना बोर्डीकर

गणेश पांडे
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुख्यमंत्र्यांनी आपल्याला योग्य सन्मान दिला जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आपला पूर्ण विश्वास आहे.

 -मेघना बोर्डीकर

परभणी : राज्यात युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्याची आहे. त्यामुळे मी परभणीत युतीचा धर्म पाळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर आपला पूर्ण विश्वास असून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण पूर्ण शक्ती लावणार असल्याची माहिती भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली.

परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याची संपूर्ण तयारी भाजप नेत्या मेघना बोर्डीकर -  साकोरे यांनी केली होती.परंतू राज्यस्तरावर युतीचा निर्णय झाल्याने परभणीतील जागेवर शिवसेनेचा उमेदवार लढणार हे निश्चित झाले. त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचे काय हा प्रश्न उभा राहिला होता. परंतू निवडणुकीची संपूर्ण तयारी केलेल्या मेघना यांनी आपण माघार घेणारच नाही असा ठाम पवित्रा घेतला होता. 

परिणामी शिवसेना उमेदवारासमोरील अडचणी वाढत होत्या. मेघना यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी  शिवसेनेच्यावतीने सर्वस्तरावर प्रयत्न केले. युतीचे मराठवाडा समन्वयक तथा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी शिष्ठाई दाखवित मेघना बोर्डीकर यांना समजाविण्याचा प्रयत्न ही केला. मेघना बोर्डीकर  यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेवू असे सांगितल्याने, शुक्रवारी (22) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेघना बोर्डीकर यांना परभणीत शिवसेनेला मदत करा असे आदेश दिल्याने मेघना बोर्डीकर यांनी निवडणुकीचे रणागंण सोडण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात बोलतांना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, "मी या मतदार संघातील संपूर्ण परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगितली. परंतू युती असल्याने युतीचा धर्म पाळणे आवश्यक आहे. परभणीत जर मी वेगळी लढले तर राज्यातील अनेक जागांवर असाच तिढा निर्माण होईल, व त्यातून भाजपचे नुकसान होईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला योग्य सन्मान दिला जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आपला पूर्ण विश्वास आहे. परभणीत युतीच्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावू".  

संबंधित लेख