medical education secretary transfer due to doctor`s pressure | Sarkarnama

दुकानदार डॉक्‍टरांवरील सर्जरीमुळे  वैद्यकीय सचिव राजगोपाल देवरा घायाळ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई : सरकारी नोकरीत असताना खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांवर सर्जरी करण्याचा वैद्यकीय सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांची ही "सर्जरी' सचिवांनाच महाग पडली आहे. डॉक्‍टरांच्या लॉबीने थेट नागपूरहून देवरा यांची बदली घडवून आणली. गेल्या अडीच वर्षांत देवरा यांची ही पाचवी बदली आहे.
 

मुंबई : सरकारी नोकरीत असताना खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांवर सर्जरी करण्याचा वैद्यकीय सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांची ही "सर्जरी' सचिवांनाच महाग पडली आहे. डॉक्‍टरांच्या लॉबीने थेट नागपूरहून देवरा यांची बदली घडवून आणली. गेल्या अडीच वर्षांत देवरा यांची ही पाचवी बदली आहे.
 
त्यांच्याकडे आता राजशिष्टाचारा विभागाचे सचिव पद देण्यात आले आहे. भाजप सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात जास्त वेळा बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांत देवरा यांचा क्रमांक लागला आहे. वैद्यकीय सचिव म्हणून येण्यापूर्वी ते आदिवासी विकास विभागाचे सचिव होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या वादग्रस्त फाइल देवरा यांनी अडवून ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सवरा यांनी आग्रह धरला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात देवरा यांचीच बदली झाली.
 
राज्य नागरी सेवा अधिनियमानुसार सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी सहा वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी राहता येत नाही. मात्र या अधिनियमाला वैद्यकीय शिक्षण विभागाने तिलांजली दिली आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव राजगोपाल देवरा यांनी तलवार काढली होती. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून खासगी रूग्णालयात सेवा पुरविणाऱ्या डॉक्‍टरांच्या पोटावरच यामुळे पाय येणार होता. त्यामुळे बाधित डॉक्‍टरांनी थेट नागपूरवरूनच सुत्रे हालवून सचिंवाचीच बदली केल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईतील शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या खासगी ओपीडी जोरात सुरू आहेत. जास्त काळ मुंबईत ठाण मांडून बसलेल्या डॉक्‍टरांच्या बदल्या करण्याची तयारीत सचिव राजगोपाल देवरा आहेत, याची कुणकुण लागताच डॉक्‍टरांनी सूत्रे हालवली. यामुळे नाराज झालेल्या देवरा यांनी वीस दिवसांची वैद्यकीय रजा टाकत बेड रेस्ट घेतल्याचे समजते आहे. 

जऱ्हाड यांच्यावरही कुऱ्हाड 

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यासोबत त्यांच्याच खात्याचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची जास्तच सलगी वाढली होती. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री आणि जानकर यांच्यातही अंतर तयार झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली केल्याची चर्चा रंगली आहे. 
सहकार आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची कोकणच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यामुळे सहकार खाते पुन्हा रिक्त झाले आहे. उद्योग संचालनालयाचे आयुक्त विजय सिंघल यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली झाली आहे. तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग संचालनालयाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पशू व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. आबासाहेब जराड यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. 

कृषी खात्यात आयुक्त म्हणून रमलेले विकास देशमुख यांच्याकडे याच विभागाची सचिव म्हणून जबाबदारी आता राहणार आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. निपुण विनायक यांच्याकडे राज्य लॉटरीचे आयुक्त पद देण्यात आले असून फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक पद जयश्री भोज यांच्याकडे सोपविण्यात आले. 

सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भूजल सर्वेक्षण विकास विभाग पुणे येथे बदली करण्यात आली आहे. राज्य लॉटरी विभागाचे आयुक्त बी. एस. कोळसे यांची नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन कलाम यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे सहसचिव म्हणून सुनील पाटील यांची तर उल्हासनगरचे महापालिका आयुक्त पदावर राजेंद्र व्ही निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव महापालिका आयुक्त आर. एस. जगताप यांची नागपूरचे विभागीय अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. 

गडचिरोलीतील सहायक जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची अकोला जिल्ह्यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली तर पुणे म्हाडा मुख्य अधिकारी म्हणून ए. डब्ल्यू. काकडे यांची नियुक्ती झाली.

संबंधित लेख