Medha Gadgil Didn't get opportunity to Become Chief Secretary | Sarkarnama

हंगामी मुख्य सचीवपदाचीही मेधा गाडगीळांना हुलकावणी; काँग्रेसी घराण्याची सून म्हणून संधी हुकली?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचीव मेधा गाडगीळ यांना राज्याच्या मुख्य सचीवपदाने हुलकावणी दिली आहे. मेधा गाडगीळ या काँग्रेस आमदाराच्या पत्नी असल्यानेच त्यांची ही संधी डावलली गेल्याची किंवा एक महिला म्हणून त्यांची ही संधी हुकल्याची अशा दोनच शक्यता असल्याची चर्चा अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा आहे. 

मुंबई - वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचीव मेधा गाडगीळ यांना राज्याच्या मुख्य सचीवपदाने हुलकावणी दिली आहे. मेधा गाडगीळ या काँग्रेस आमदाराच्या पत्नी असल्यानेच त्यांची ही संधी डावलली गेल्याची किंवा एक महिला म्हणून त्यांची ही संधी हुकल्याची अशा दोनच शक्यता असल्याची चर्चा अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा आहे. 

मेधा गाडगीळ या काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनंत गाडगीळ यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री (कै.) बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे मेधा गाडगीळ यांचे सासरे. त्यांचे आजेसासरे (कै.) काकासाहेब गाडगीळ हे देखिल केंद्रातले काँग्रेसचे मोठे प्रस्थ होते. मेधा गाडगीळ या पुढील वर्षी आॅगस्टमध्ये निवृत्त होत आहेत.  

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मेधा गाडगीळ या सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. राज्याचे मुख्य सचीव दिनेशकुमार जैन हे गाडगीळ यांच्याच 1983 च्या तुकडीतले अधिकारी. गेल्या मे महिन्यात जैन यांची मुख्य सचीवपदी नियुक्ती करण्यात आली. जैन हे गाडगीळ यांच्यापेक्षा रँकिंगमध्ये ज्युनिअर आहेत. तरीही गाडगीळ यांना डावलून त्यांच्याकडे मुख्य सचीवपद सोपवण्यात आले.

जैन सध्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्यांनी जाताना आपल्या पदाची सूत्रे आपल्याच बॅचच्या यु.पी.एस. मदान यांच्याकडे सोपवली आहेत. मदान हे सध्या राज्याचे वित्त सचीव आहेत. त्यांचा लौकिक चांगला आहे. मात्र, हंगामी मुख्य सचीवपद मेधा गाडगीळ यांना न सोपवण्यामागे नक्की कारण काय, याची चर्चा मंत्रालयात सुरु आहे. 

संबंधित लेख