M.D. Of M.S.C. bank resigns abruptly | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राज्य बॅंकेच्या "एमडीं'चा राजीनामा  प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत वादाची ठिणगी 

संजय मिस्कीन : सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 19 मे 2017

गाडीही नाकारली 

बैठकीतून संतापाने बाहेर पडलेल्या डॉ. प्रमोद कर्नाड यांनी घरी परताना बॅंकेची गाडी घेण्याचेही नाकारले. ते टॅक्‍सी करून जातो असे म्हणत असतानाच बॅंकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना गाडीत बसवले. या सर्व प्रकरणाबाबत प्रमोद कर्नाड यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. 

मुंबई:  सहकाराची शिखर बॅंक असलेल्या वादग्रस्त राज्य सहकारी बॅंकेचे "अच्छे दिन' परतण्याचे चिन्ह असतानाच आज व्यवस्थापकिय संचालक (एमडी) डॉ. प्रमोद कर्नाड यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतच आज कर्नाड यांनी राजीनामा देत बॅंकेतून थेट बाहेर पडल्याने सहकार क्षेत्रात चर्चा सुरू आहे.  

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बुडीत कर्जाच्या प्रकरणावरून प्रशासकीय मंडळाने कर्नाड यांना जबाबदार धरण्याची प्रक्रीया सुरू केल्याने हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होती. यामधे प्रशासकीय मंडळाचे सदस्य अशोक मगदूम व के.एन. तांबे उपस्थित होते. बैठकीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या सुमारे 25 कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणाचा विषय चर्चेला आला.

हे कर्ज बुडीत झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासकीय मंडळाचे अधिकारी अचंबित झाले. या बाजार समितीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती कर्नाड यांनी दिली. मात्र, व्यवस्थापकीय संचालक म्हणून कर्नाड यांनी कर्ज वसुलीची जबाबदारी पार पाडली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते. 

या सोबतच नाशिक जिल्ह्यातील काजवा सहकारी साखर कारखाना, धुळे येथील प्रियदर्शनी सहकारी सुत गिरणी, औरंगाबादची सहकारी सूत गिरणी व नागपूर चा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांना दिलेल्या कर्जाची प्रकरणे देखील समोर आली.

यामुळे राज्य सरकारला सुमारे 30 ते 35 कोटी रूपयांचा फटका राज्य बॅंकेला बसल्याने व्यवस्थापकीय संचालकांना जबाबदार का धरू नये अशी चर्चा प्रशासकीय मंडळात झाल्याचे समजते.

त्यासाठी कर्नाड यांना नोटीस बजावण्याचा निर्णय प्रशासकीय मंडळ घेण्याच्या तयारीत होते. अशातच कर्नाड यांनी तडकाफडकी राजीनामा देत बैठक अर्धवट सोडून बॅंकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

 

संबंधित लेख