mayor mukta tilak | Sarkarnama

आरक्षणावरील विधानामुळे "महापौर टिळक' वादात ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुक्‍ता टिळक यांच्या विधानानंतर त्यांच्यावर टीका करणारांची संख्या जास्त आहे. हा वाद काहींनी लोकमान्य टिळकांपर्यंत नेला आहे. टिळकांनीही उपेक्षित वर्गाला
संसदेत जाण्याच्या विरोधात भूमिका घेतल्याची आठवणही काही लोक करून देत आहेत. 

पुणे : "आरक्षणामुळे ब्राह्मण समाजातील तरुण परदेशात जाऊन स्थायिक होतात', अशा आशयाचे विधान केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक वादात सापडल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी केलेल्या विधानाचे शनिवार राज्यभर पडसाद उमटले. दरम्यान, या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा टिळक यांनी केला आहे. 

नाशिक येथील चित्पावन ब्राह्मण संघाच्यावतीने आयोजित परशुराम वेद पुरस्कार सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. "ब्राह्मण समाजातील मुले परदेशात जाण्याचे आणि
तिथे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला देशातील आरक्षणाची स्थिती कारणीभूत आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला मायदेशी आणण्याची, त्यांना वाव देण्याची गरज
आहे. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत', असे मत त्या कार्यक्रमात टिळक यांनी मांडले होते. यासंबंधीच्या बातम्या शनिवारच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर दिवसभर
विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. मुक्‍ता टिळक यांची मानसिकता आरक्षणविरोधी असल्याची टीका करण्यात आली. तसेच टिळक या भाजपचीच भूमिका मांडत
असल्याचा दावा करून पक्षावरही टीकेची झोड उठवण्यात आली. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाचे प्रतिबिंब दिवसभर सोशल मिडीयात दिसत होते. 

दरम्यान, आपल्या विधानाचा विपर्यास केला आहे. आरक्षण हा शब्द भाषणात उच्चारलेला नाही. ब्राह्मण मुलांनी भारतात येऊन उद्योग, व्यवसाय करण्यासारखी पोषक
परिस्थिती निर्माण करावी, असे आपण म्हटल्याचा खुलासा मुक्‍ता टिळक यांनी माध्यमांकडे केला आहे. 

 

संबंधित लेख