mayawati demand 39 seats from congress | Sarkarnama

उत्तर प्रदेश सोडून 39 जागा द्या; मायावतींचा कॉंग्रेसला निरोप 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मोदी सरकारला महाआघाडीच्या माध्यमातून धक्का देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असला तरी याच महाआघाडीतील प्रमुख खेळाडू असलेल्या बहुजन समाज पक्षाने यानिमित्ताने देशभरात विस्ताराची रणनीती आखली आहे. महाआघाडीच्या यशासाठी उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये 39 जागांची मागणी बसपने कॉंग्रेसकडे केल्याचे समजते. 

नवी दिल्ली : मोदी सरकारला महाआघाडीच्या माध्यमातून धक्का देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असला तरी याच महाआघाडीतील प्रमुख खेळाडू असलेल्या बहुजन समाज पक्षाने यानिमित्ताने देशभरात विस्ताराची रणनीती आखली आहे. महाआघाडीच्या यशासाठी उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये 39 जागांची मागणी बसपने कॉंग्रेसकडे केल्याचे समजते. 

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे समीकरण योग्य प्रकारे जुळल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये भाजपला जोरदार झटका बसेल असे कॉंग्रेस नेतृत्वाचे मानणे आहे. त्यासाठी विशेषतः 80 खासदार लोकसभेवर पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशात बसप आणि समाजवादी पक्षासोबत आघाडीसाठी सकारात्मक संवाद सुरू असल्याचेही कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे आगामी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही बसपशी हातमिळवणीसाठी कॉंग्रेसचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. 

मात्र, विधानसभांप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही या मैत्रीची पुरेपूर किंमत कॉंग्रेसकडून वसूल करण्याची बसपची रणनीती आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेत (विरोधकांच्या आघाडीत) कॉंग्रेस खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्याचे उद्दिष्ट बसप नेतृत्वाने ठेवले आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या कॉंग्रेसचे प्रभावक्षेत्र असलेल्या राज्यांमधून तब्बल 39 जागांची मागणी बसपने कॉंग्रेसकडे केली असल्याचे कळते. 

यासंदर्भात, बसप नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी कॉंग्रेसचे रणनीतीकार मानले जाणारे अहमद पटेल यांची अलीकडेच भेट घेऊन मायावतींचा निरोप कळविल्याचेही सूत्रांकडून समजते. महाराष्ट्रात, विदर्भात बसपच्या मतांची टक्केवारी लक्षणीय आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेशात बसपचे आमदारही निवडून आले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख