martha kranti morcha beed | Sarkarnama

वकिलांनी लढविले निशुल्क प्रकरण ; आरक्षण आंदोलनातील गेवराईच्या 11 जणांना जामीन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या 11 जणांना शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. वकिलांनी विनाशुल्क हे प्रकरण लढविले हे विशेष. तर, आज जामिन मिळाल्याने एका आंदोलनकर्त्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आले. 

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या 11 जणांना शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. वकिलांनी विनाशुल्क हे प्रकरण लढविले हे विशेष. तर, आज जामिन मिळाल्याने एका आंदोलनकर्त्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आले. 

परळी येथे ठिय्या आंदोलनाला पाठींबा म्हणून जिल्ह्यात आंदोलनाची धग पेटली आणि गेवराईत ता. 25 जुलैला युवकांनी अर्धनग्न आंदोलन केले. आंदोलकांनी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या मांडत घोषणाही दिल्या होत्या. यावेळी आंदोलक आणि आमदारांत बाचाबाचीचा प्रकारही घडला. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने उडालेल्या गोंधळात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. 

या प्रकरणी 93 आंदोलकांवर गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले. यातील वसंत सुसकर, कृष्ण गळगुंडे, महेश बेदरे, अर्जुन चाळक, शिवनाथ परळकर, सुनिल ठोसर, दिपक आतकरे, गोवर्धन घाडगे, स्वप्नील मस्के, गणेश मोळे आणि सचिन मोटे यांना अटक झाली होती. गेवराई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर 26 जुलै पासून हे आंदोलक जिल्हा कारागृहात होते. शुक्रवारी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांना जामिन मंजुर करून दर शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे. 

जिल्हा न्यायालयातील मराठा समाजाच्या सर्व वकिलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यातील या आंदोलकांची बाजू न्यायालयात मोफत मांडण्याचा निर्णय केला होता. सामाजिक दायित्व निभावून त्यांनी एकजुटीने याप्रकरणात आरोपीची बाजू मांडली. ऍड.शहाजी जगताप, कृष्णराव पंडित, मंगेश पोकळे, बाळासाहेब कोल्हे, शहादेव ननवरे, महादेव तुपे, योगेश शेळके, नामदेव साबळे, सचिन आबुज, कल्पेश पवने, काळकुटे, दाभाडे यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व वकिलांनी यासाठी पुढाकार घेतला. 

वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहता आले 
गेवराईतील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार गणेश बेदरे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे चिरंजीव महेश बेदरे हे देखील आंदोलनातील गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होते. त्यांना वडिलांशी शेवटचे बोलणेही करता आले नाही. वडिलांच्या अंत्यविधीला देखील उपस्थित राहता येईल की नाही याबद्दल शंका होती. मात्र ऍड. शहाजी जगताप यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने जामीन मंजुर केल्यामुळे सर्व प्रक्रिया करून महेश बेदरे यांना अंत्यविधीस उपस्थित राहता आले. 

संबंधित लेख