Marathi Political News Tukaram Mundhe Hospital | Sarkarnama

तुकाराम मुंढे रुग्णालयाच्या अस्वच्छतेने त्रस्त 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज महापालिकेच्या सर्वात मोठ्या बिटको रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपुस केली. विविध कक्षांना भेटी दिल्या. मात्र, सबंध रुग्णालयाची अव्यवस्था, अस्वच्छता पाहून ते त्रस्त झाले. मात्र, त्यांनी संयम ठेवत "आधी ताबडतोब स्वच्छता करा. अन्यथा कारवाई करणार'' असा सज्जड इशारा यावेळी दिला. 

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज महापालिकेच्या सर्वात मोठ्या बिटको रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपुस केली. विविध कक्षांना भेटी दिल्या. मात्र, सबंध रुग्णालयाची अव्यवस्था, अस्वच्छता पाहून ते त्रस्त झाले. मात्र, त्यांनी संयम ठेवत "आधी ताबडतोब स्वच्छता करा. अन्यथा कारवाई करणार'' असा सज्जड इशारा यावेळी दिला. 

बिटको हे महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. मात्र, त्यातील सेवा वैद्यकीय सुविधांबाबत नेहेमीच तक्रारी असतात. आज आयुक्त मुंढे यांनी शहर अभियंता व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत येथे भेट दिली. रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु आहे. मात्र, त्याला सतत विलंब होत असल्याने आयुक्तांनी त्याची सविस्तर माहिती घेतली. पावसाळ्यापूर्वी रुग्णालय सुरु करण्याच्या आणि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 

त्यानंतर त्यांनी अनपेक्षीतपणे रुग्णायाच्या विविध वैद्यकीय कक्षांमध्ये फेरफटका व पाहणी सुरु केली. यावेळी ओपीडी कक्षाच्या रांगेतील नागरिकांची विचारपुस करीत अडचणी विचारल्या. यानंतर पुरुष तसेच महिला रुग्ण वैद्यकीय कक्षात रुग्णांची माहिती घेतली. प्रत्यक्ष रुग्णांशीही बोलले. मात्र हे सबंध वॉर्ड एव्हढे अस्वच्छ होते की सगळीकडे दुर्गंधी जाणवत होती. अनेक बेडशीटस्‌वर एव्हढे डाग होते की त्या कधी स्वच्छ केल्या होत्या की नाही अशी शंका वाटावी. दरवाजे, खिडक्‍यांना जाळे तर भिंतीवर खुपच डाग, उखडलेले रंग अशी स्थिती होती. 

ही परिस्थिती तातडीने दुरुस्त करावी. विशेषतः स्वच्छता ताबडतोब सुरु करावी आणि त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. त्यात विलंब झाल्यास गंभीर कारवाईचा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी विभागप्रमुखांनाही त्यांनी विविध सुचना देत प्रत्येक तक्रारीचे निरसन करण्यास सांगितले. मुख्य अभियंता उत्तम पवार, अभियंता सी. बी. आहेर, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, डॉ. जयंत फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भंडारी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख