कागदी वाघांच्या जीवावर शिवसेना सांगलीत लढणार तरी कशी? 

एरवी सांगलीच्या आखाड्यात शिवसेनेचे काय झाले, याला फार महत्व आले नसते. ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होत आहे. इथली कामगिरी राज्यभरात एक हवा निर्माण करण्यासाठी नक्कीच फायद्याची राहणार आहे. त्यादृष्टीने सारेच पक्ष जोमाने तयारीला लागलेले आहेत. अशावेळी शिवसेनेची बूथरचनाच तकलादू असल्याचे चित्र किर्तीकरांसमोर आल्याने त्यांनी जिल्हाप्रमुखांना धारेवर धरले होते. आता किर्तीकर हे प्रकरण किती गांभिर्याने घेतात, याकडे लक्ष असणार आहे.
कागदी वाघांच्या जीवावर शिवसेना सांगलीत लढणार तरी कशी? 

सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांच्या महापालिकेची निवडणूक म्हणजे कुठल्या ग्रामपंचायतीचा फड नव्हे, याची पक्की जाणीव आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झाली आहे. उसन्या अवसानावर डरकाळ्या फोडून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला पक्की रचना लागते, याचे भान विसरलेल्या इथल्या कागदी वाघांना घेऊन शिवसेना लढणार कशी, हाच मुख्य प्रश्‍न पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गजानन किर्तीकर यांना पडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सांगलीच्या रचनेत फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.
 
एरवी सांगलीच्या आखाड्यात शिवसेनेचे काय झाले, याला फार महत्व आले नसते. ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होत आहे. इथली कामगिरी राज्यभरात एक हवा निर्माण करण्यासाठी नक्कीच फायद्याची राहणार आहे. त्यादृष्टीने सारेच पक्ष जोमाने तयारीला लागलेले आहेत. अशावेळी शिवसेनेची बूथरचनाच तकलादू असल्याचे चित्र किर्तीकरांसमोर आल्याने त्यांनी जिल्हाप्रमुखांना धारेवर धरले होते. आता किर्तीकर हे प्रकरण किती गांभिर्याने घेतात, याकडे लक्ष असणार आहे. विशेषतः संपर्कनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांना सांगलीच्या आखाड्याकडे अधिक गांभिर्याने पाहण्याची सूचना दिली जाऊ शकते. 

किर्तीकर दोन दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर होते. त्यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपद आल्यानंतर त्यांचा इथला पहिलाच मेळावा. त्यात किर्तीकरांसमोर आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नगरसेविका अश्‍विनी कांबळे यांच्या कामांचे उद्‌घाटन, पक्षप्रवेश, पदाधिकारी मेळावा असा जंगी 'प्लॅन' होता; परंतु, किर्तीकर हुशार निघाले. त्यांनी मुळाला हात घातला. कोणत्याही निवडणुकीसाठी बूथ हा मुख्य कणा असतो. ज्याचे बूथ भक्कम, तो पक्ष भक्कम, हे सरळ गणित; त्यामुळे त्यांनी मेळाव्यातील बूथ प्रमुखांना हात वर करण्याची सूचना केली आणि तेथेच कागदी वाघांचा मुखवटा फाटला. पाचशेच्या गर्दीत तीन हात वर आले... तालुकाप्रमुख, उपप्रमुखांच्या गणतीत चार हात वर गेले. हे अपयश कुणाचे? केवळ मोठी भाषणे ठोकून सभा जिंकता येतात, निवडणुका नाही, याची पक्‍की जाण किर्तीकरांना आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाप्रमुखांचा व्यासपीठावरूनच समाचार घेतला. 

सांगलीच्या शिवसेनेसाठी हे शुभ संकेत होते. याआधी सांगली तरी अशी हजेरी, असा पंचनामा, असा जाब विचारणं कधी झालं नव्हतं. त्यामुळे जे आहे ते 'लई भारी', असा समज होता. त्यामुळेच शिवसेनेची अवस्था 'बोन्साय'सारखी झाली होती. वरवर वाढ दिसायची; मात्र मुळे खुंटली होती. मधल्या काळात विट्यातून आमदार अनिल बाबर आणि सांगलीत माजी आमदार संभाजी पवार शिवसेनेत आले, अन्यथा सेनेची गणती नव्हतीच. अप्पासाहेब काटकर, रावसाहेब घेवारे, लतिफ कुरणे यांच्यासारखे जिद्दीने लढणारे नेते शिवसेनेला टिकवून होते. 

आता स्थिती बदलली आहे. शिवसेना राज्यात एकहाती सत्तेची स्वप्ने पाहतेय. स्वबळाची घोषणा देतेय. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी साऱ्यांना अंगावर घेतेय. अशा वेळी तळापर्यंत पक्ष मजबूत करणे क्रमप्राप्त आहे. ते सांगलीत होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती किर्तीकरांना समजायला वेळ लागला नाही. संपर्क नेते बानुगडे पाटील यांचे पक्षाच्या बांधणीकडे लक्ष होते का? जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि संजय विभूते शहराबाहेर राहून मनपाची तयारी कशी करणार? इथल्या जनतेला विश्‍वास वाटेल, असे चेहरे कसे पुढे आणणार? 78 जागांसाठी तगडे उमेदवार कसे देणार, याची उत्तरे किर्तीकरांनी जाहीर मागितली नाहीत.

कारण, या उत्तरांपर्यंत पोचण्यासाठी आधी बाराखडी पक्की असावी लागते. तिच कच्ची असल्याने आधी बूथ बांधण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत नव्याने आलेल्या; पण मनपा क्षेत्रातील सेनेचा चेहरा असलेल्या पृथ्वीराज पवार, दिगंबर जाधव आणि शेखर माने यांच्यासाठी ही मोट बांधण्याचे आव्हान असणार आहे. 

येथे भाजपची स्थिती कमकुवतच होती, मात्र, सत्ता आल्यानंतर त्यांनी पक्ष मजबुतीकडे लक्ष दिले. अनेकांना पक्ष प्रवेश दिला, ताकद दिली. विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावून लोकसमुह वाढवला. काँग्रेस, राष्ट्रवादीतले लोक घेतले. त्यांना ताकद दिली. शिवसेनेने यापैकी काय केले? विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा इथे लढणाऱ्या शिवसेनेने तगडी लढत दिली, मात्र त्यानंतर माजी आमदार संभाजी पवार गट शिवसेनेपासून दूरच राहिला. त्याची उत्तरे शोधली गेली नाहीत. पृथ्वीराज पवार यांना राष्ट्रीय पातळीवरचे पद दिले आहे, मात्र स्थानिक पातळीवर ताकद दिली नाही. येथे नेतृत्वाची पोकळी कायम आहे. 

संघटक म्हणून दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने हे दोन उत्तम प्रशासक व लोकसंपर्क असलेले नेते सेनेत आले आहेत. त्यांनी आपले काम चालू ठवलेय, मात्र राज्य पातळीवरून थेट ताकद मिळाल्याशिवाय सेना वाढणार कशी? महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी हवी असल्यास सांगलीच्या शिवसेनेत फेररचनेबरोबरच लोकसमुह जमेल, अशी रचना करावीच लागेल. कारण भावनेवर राजकारण चालत नाही, हे आम्हाला समजते, आम्ही दूधखुळे नाही, असे स्वतः किर्तीकर म्हणाले होते. त्यांना ते आता सिद्ध करावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com