Marathi Political News Shivsena Chadrakant Khaire Interview | Sarkarnama

पुढचा पंतप्रधान शिवसेनेचे खासदार ठरवतील- चंद्रकांत खैरे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

''राजकारणात दहशत फार काळ टिकत नसते हे मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीत दिसून येईल. सरकारच्या विरोधातील राग मतदार मतपेटीतून व्यक्त करतील आणि पुढचा पंतप्रधान शिवसेनेचे निवडून आलेले अठरा खासदारच ठरवतील,'' असा विश्‍वास शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

औरंगाबाद : ''माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याकाळात साडेचोवीस पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवले होते. एनडीएतील सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पध्दत होती. पण आज मोदी यांची भाजपमध्ये प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याची हिमंत भाजपच्या एकाही मंत्री किंवा खासदारात नाही. परंतु, राजकारणात दहशत फार काळ टिकत नसते हे मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीत दिसून येईल. सरकारच्या विरोधातील राग मतदार मतपेटीतून व्यक्त करतील आणि पुढचा पंतप्रधान शिवसेनेचे निवडून आलेले अठरा खासदारच ठरवतील,'' असा विश्‍वास शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी राज्य, केंद्र व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर आपली सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, ''शिवसेनेने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिक झपाटून कामाला लागलेला असतानाच भाजपकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न देखील केले जात आहे. युती होणार आहे अशी आवई उठवून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा माईंड गेम भाजप खेळत आहे. पण शिवसैनिक आता त्याला बळी पडणार नाहीत.'' 

मातोश्रीवर माझ्या शब्दाला किंमत
1985 पासून मी शिवसेनेत आहे, आमदार, मंत्री, खासदार झालो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही तोच विश्‍वास कायम ठेवला. पक्ष आणि पक्षावर श्रध्दा ठेवावी लागते, त्याचे फळ तुम्हाला मिळतेच, असेही खैरे म्हणाले.

शिवसेना नेतेपदी बढती दिली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. निष्ठा आणि प्रामाणिकपणाला मिळालेली ही मी पावती समजतो. पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्‍वास असल्यामुळेच मातोश्रीवर माझ्या शब्दाला किमंत आहे. माझा शब्द विचारात घेतल्याशिवाय इकडचे निर्णय घेतले जात नाही हीच माझ्या आयुष्यातली खरी कमाई असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. 

माझे काम लोक विसरले नाहीत
इतक्‍या वर्षात मी मतदारसंघाचा काय विकास केला? असा प्रश्‍न विरोधकांकडून विचारला जातो. विरोधक विसरले असले तरी माझे काम लोक विसरलेले नाहीत. म्हणूनच सलग चारवेळा लोकांनी मला निवडून दिले. डीएमआयसी, स्मार्टसिटी, समांतर, भूमिगत गटार योजना, राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे विकासाची अनेक कामे माझ्या काळात झाली. दिल्लीत निधी आणि विकासकामांसाठी पाठपुरावा करावा लागतो आणि मी तो सातत्याने करतो म्हणूनच जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली आणि पुढे देखील होतील असा दावा खैरे यांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणूकीत माझा पराभव करण्यासाठी भाजपने अनेकांना पैसे पुरवून माझ्या विरोधात उभे केले आहे. कोट्यवधी रूपये खर्च करण्याची तयारी सुरू आहे. यापुर्वीही मला पराभूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण जनतेनेच ते हाणून पाडले. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील माझ्या समोर कोणीही उमेदवार असला एक लाख 35 हजारांचे मताधिक्‍य घेऊन मी पुन्हा विजयी होईल असा विश्‍वास खैरे यांनी व्यक्त केला. 

राज्यातील सत्तेत असलेली शिवसेना सरकारच्या विरोधात भूमिका घेते पण सत्तेतून बाहेर पडत नाही या विषयावरून होणाऱ्या टीकेलाही खैरे यांनी उत्तर दिले. राज्यातील सरकारमध्ये आम्ही जनतेसाठी आहोत. सरकारवर कुणाचे नियंत्रण नसले तर ते मनमानी कारभार करतील. त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवून जनतेच्या भल्याची कामे करून घेता यावी यासाठी शिवसेना सरकारमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख