शरद पवार खोडकर आणि मिस्कील : सुशीलकुमार शिंदे

शरद पवार खोडकर आणि मिस्कील : सुशीलकुमार शिंदे

पुणे : ''आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात गंभीर असणारे शरद पवार तितकेच मिस्किल आणि खोडकर आहेत, त्यांचा हा खोडकरपणा त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या बरोबरच्यांनी अनुभवलाच, पण आजही या त्यांच्या मिस्किलपणाचा अनुभव येतो,'' असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवार यांच्या वक्तित्वाचे पैलू उलगडले. ते माझे राजकीय गुरु असल्याचे सांगत गुरुचा सत्कार शिष्याच्या हस्ते होणे यापेक्षा अधिक काय हवे, अशीही भावना शिंदे यांनी व्यक्त केली. 


जागतिक मराठी अकादमीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे ही मुलाखत घेणार असल्याने पुण्याच्या बीएमसीसी महाविद्यालयाचे मैदान तुडुंब भरले होते. मागचे एकदोन महिने या मुलाखतीच्या तारखा पुढे गेल्याने आजच्या मुलाखतीची पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरातील मराठी माणसांमध्ये उत्सुकता होती. या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

ज्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सत्कार झाला त्या महाविद्यालयाचे मोठेपण सांगताना शिंदे म्हणाले, "पवार यांचे नेतृत्व आणि कर्तुत्व या महाविद्यालयात फुलले. ग्रामीण भागातून आलेल्या पवार यांच्यासारख्या तरुणाने पुढे देशाला आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.'' पवार यांच्या सारख्या विद्यार्थ्यांमुळे या महाविद्यालयाचे नांव देशपातळीवर गेले असेही शिंदे म्हणाले. 

पवार यांच्या मिस्किलपणाचा किस्साही शिंदे यांनी सांगितला. तो त्यांच्याच शब्दात....मी जवळच असलेल्या लाॅ काॅलेजमध्ये शिकायचो. पवारांना ज्युनिअर होतो. त्यावेळी पवारांच्या खोडकरपणा हा विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय असायचा. त्यावेळी त्यांच्या वर्गात एक मुलगा होता. मला त्याचे नाव माहित आहे. मी खात्री करुन घेतली आहे.....तो एका मुलीवर प्रेम करत होता. तिला तो पत्र लिहायचा....ती पत्र फाडून टाकायची. एक दिवस शरदरावांनी त्या मुलीच्या नावानं त्या मुलाला पत्र लिहिलं....मी तुझ्यावर प्रेम करते....येत्या रविवारी 3 च्या शोला अमूक ठिकाणी ये....असंही शरदरावांनी त्या पत्रात लिहिलं....तो मुलगा चित्रपटाला गेला...आत बसला चित्रपट सुरु झाला....अंधारात हळूच शरदराव त्या मुलाच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसले आणि त्या मुलाला विचारलं...काय रे आली का ती!

शिंदे हा किस्सा सांगत असतानाही पवार मिस्किलपणे त्यांच्याकडे पहात गालातल्या गालात हसत होते. पवार आपले राजकीय गुरु असल्याचे नमूद करत शिंदे यांनी 'शिष्याच्या हातून गुरुचा सत्कार घडणं यापेक्षा अधिक काय हवं,' अशी भावना व्यक्त केली. शरद पवार कला, नाट्य, कुस्ती, खेळ यांचे पुजक असल्याचे सांगत शिंदे यांनी पवार यांच्या चौफेर व्यक्तीमत्त्वाचाही उल्लेख केला. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com