Marathi Political News Sharad Pawar Ashok Chavan | Sarkarnama

आर्थिक निकषावर आरक्षण हे शरद पवारांचे व्यक्तीगत मत : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

अशोक चव्हाण रविवारी (ता. 4) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते. 

लातूर : ''आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे व्यक्तीगत मत आहे. या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका पक्ष पातळीवर व्यापक चर्चा केल्यानंतरच जाहीर करेल,'' असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

अशोक चव्हाण रविवारी (ता. 4) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते. 

काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करणार का? या प्रश्‍नावर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांशी आघाडी करण्याच्या संदर्भात मत जाणून घेतली जात आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांना देखील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर याचा अहवाल काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना सादर केला जाईल. तेच आघाडीसंदर्भात निर्णय घेतील, असे ते म्हणाले. 

संविधानाने दिलेले आरक्षण कायम राहावे
''आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकऱ्यांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल,'' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

विविध राज्यातील निवडणुकात काँग्रेसचा पराभव होत आहे. ही खऱी गोष्ट आहे. त्याला राहूल गांधी हे जबाबदार आहेत किंवा त्यांचे नेतृत्व लोकांना मान्य नाही असे म्हणता येणार नाही. ती राज्य व स्थानिकच्या नेत्यांची जबाबदारी असते. पोटनिवडणुकात पक्षाला मोठे यश मिळाले याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारवर टीका करतांना सरकार बोलण्यात ऑनलाईन व कृतीत ऑफ लाईन असल्याचा टोला त्यांनी लगावला. तेराशे शाळा बंद केल्या जात आहेत तर दुसरीकडे दारुच्या दुकानांना परवानगी दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संबंधित लेख