Marathi Political News Satara Mathadi | Sarkarnama

विधान परिषदेवर माथाडी प्रतिनिधी कोण जाणार : नरेंद्र पाटील कि वसंतराव मानकुमरे....?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवर निवडून आले असून माथाडी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली होती. त्यांची मुदत 27 जुलै 2018 ला म्हणजेच पाच महिन्यानंतर संपत आहे. त्यांच्याजागी माथाडींचे प्रतिनिधीत्व करण्यास जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. नरेंद्र पाटील यांनाच पुन्हा संधी मिळणार की जावलीतून माथाडीचे नेते वसंतराव मानकुमरे यांचे नाव जिल्ह्यातून पुढे केले जाणार याबाबत उत्सुकता आहे. 

सातारा : विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवर निवडून आले असून माथाडी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली होती. त्यांची मुदत 27 जुलै 2018 ला म्हणजेच पाच महिन्यानंतर संपत आहे. त्यांच्याजागी माथाडींचे प्रतिनिधीत्व करण्यास जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. नरेंद्र पाटील यांनाच पुन्हा संधी मिळणार की जावलीतून माथाडीचे नेते वसंतराव मानकुमरे यांचे नाव जिल्ह्यातून पुढे केले जाणार याबाबत उत्सुकता आहे. 

जिल्ह्यात विधान परिषदेचे तीन आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, नरेंद्र पाटील आणि काँग्रेसचे आनंदराव पाटील यांचा समावेश आहे. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आहेत. तर आनंदराव पाटील हे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. यातील आमदार नरेंद्र पाटील यांना माथाडी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून संधी देऊन पक्षाने विधान परिषदेवर निवडून दिले आहे. आता येत्या 27 जुलैला त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे माथाडीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाच पुन्हा संधी मिळणार का, हा प्रश्‍न आहे. तसेच माथाडीतून जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे यांचेही नाव ऐनवेळी पुढे केले जाऊ शकते. मानकुमरे सध्या सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मेढ्यात काल झालेल्या कार्यक्रमात खुद्द आमदार नरेंद्र पाटील यांनी ''माझी आमदारकीची मुदत सहा महिन्यांनी संपत आहे. वसंतराव मानकुमरे भाऊ पण माथाडींचे नेतृत्व करतात. आता विधान परिषदेवर त्यांना माथाडींचे प्रतिनिधी म्हणून पाठवा, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे मला म्हणालेत. त्यासाठी माझी ना नाही,'' असे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या शिफारशीनुसार मानकुमरेंना आमदारकीही
मिळण्याची शक्‍यता बळावली आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे वाढलेले वजन लक्षात घेता. त्यांच्या शब्दाला पक्षश्रेष्ठीही उचलून धरतील, यात शंका नाही.

संबंधित लेख