Marathi Political News Raosaheb Danve Ramdev Baba | Sarkarnama

रामदेव बाबांचा 'योग' दानवे पिता-पुत्रांना पुन्हा 'राजयोग' देणार का? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या जालना लोकसभा मतदारसंघात 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रामदेव बाबा यांच्या योग शिबीराचे आयोजन केले होते. जालना शहर आणि भोकरदन तालुक्‍यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रामदेव बाबांच्या 'योग' शिबीराने दानवे पिता-पुत्रांना आगामी निवडणुकीत पुन्हा 'राजयोग' येईल का?, अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या जालना लोकसभा मतदारसंघात 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रामदेव बाबा यांच्या योग शिबीराचे आयोजन केले होते. जालना शहर आणि भोकरदन तालुक्‍यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रामदेव बाबांच्या 'योग' शिबीराने दानवे पिता-पुत्रांना आगामी निवडणुकीत पुन्हा 'राजयोग' येईल का?, अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

2014 मध्ये निर्माण झालेली मोदी लाट गेल्या वर्षी झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील कायम होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय झाल्यानंतरही मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आणि हा पक्ष राज्यात 'नंबर वन' ठरला. अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांना देखील यशाचे श्रेय मिळाले. 

पण गुजरात विधानसभा, त्यानंतर झालेल्या राजस्थान आणि पश्‍चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत मात्र वारे उलट्या दिशेने वाहू लागल्याचे दिसून आले. कोरेगाव भीमा प्रकरण, शिवाजी महाराज जयंतीच्या तोंडावर नगरच्या भाजप उपमहापौर छिंदम याने केलेले घृणास्पद वक्तव्य, शेतकरी कर्जमाफीवरून निर्माण झालेला रोष आणि पीएनबी बॅंकेत 11 हजार पाचशे कोटींचा घोटाळा करून विदेशात पळून गेलेला निरव मोदी या प्रकरणामुळे भाजपच्या प्रतिमेला तडा गेल्याचे बोलले जाते. 

अशा परिस्थीतीत आपल्या गडाला हादरा बसू नये याची काळजी रावसाहेब दानवे यांनी रामदेव बाबांच्या योग शिबिराच्या निमित्ताने घेतल्याचे दिसते. 2014 च्या मोदी लाटेतही भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून दानवे यांचे पुत्र संतोष दानवे अवघ्या सहा हजार मतांनी विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनंतर त्यांच्या मतदारसंघात तयार झालेले भाजप विरोधी वातावरण बदलण्याचा प्रयत्न देखील दानवे यांनी रामदेव बाबांच्या माध्यमातून तालुक्‍यात केल्याची चर्चा आहे. 

जालना आणि भोकरदन या दोन्ही ठिकाणी आयोजित केलेले रामदेव बाबांचे योग शिबीर, शेतकरी मार्गदर्शन मेळावा, योग दिक्षा कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे दानवे यांचा हा प्रयत्न प्रथमदर्शनी यशस्वी झाल्याचे बोलले जाते. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा सल्ला देतांनाच रामदेव बाबांनी रोहिंग्यांचा विषय काढत राष्ट्रीय स्तरावली धोक्‍याकडे मतदारसंघातील लोकांचे लक्ष वेधले. याचा फायदा दानवे पिता-पुत्रांना आगामी निवडणुकीत निश्‍चितच होईल असा अंदाज बांधला जात आहे. 

दानेवांना आव्हानाची जाणीव?
सलग चारवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले रावसाहेब दानवे सध्या राज्यातील भाजपचे बडे नेते आहेत. मोकळा ढाकळा स्वभाव आणि अस्सल ग्रामीण शैलीने त्यांना जितकी प्रसिध्दी मिळवून दिली, तेवढेच वाईट अनुभव देखील त्यांच्या वाट्याला आले. निवडणूक प्रचार सभेतील लक्ष्मी दर्शनाचे वक्तव्य असो की शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान यामुळे रावसाहेब चांगलेच अडचणीत आले होते. या विधानांचाच हत्यारा सारखा वापर करत जालना लोकसभा मतदारसंघात त्यांना आव्हान देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. 

शिवसेनेने स्वबळाची घोषणा करण्याआधी पासूनच जालन्याचे आमदार व राज्यमंत्री अर्जून खोतकर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरु झाली होती. यात नव्याने विदर्भातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या नावाची भर पडली आहे. 

बच्चू कडू दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लढणार या चर्चेने राज्यभरातून त्यांच्यावर लोकसभा लढवण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. बच्चू कडू यांनी दानवे यांच्या शेतकरी विरोधी केलेल्या वक्तव्याचा बदला म्हणून मी निवडणूक लढवणार, असे सांगत राज्यभरातील शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवली आहे. 

त्यामुळे रावसाहेब दानवे यांना आगामी निवडणूक सोपी नाही याची जाणीव झाली असावी. शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि बच्चू कडू जालन्यातून मैदानात उतरले तर दानवे यांना विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. रामदेव बाबा यांच्या योग शिबीराचे आयोजन हा त्याच प्रयत्नाचा भाग म्हणावा लागेल. 

संबंधित लेख