Marathi Political News Randhir Sawarkar Akola BJP MLA | Sarkarnama

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची पक्ष पदाधिकाऱ्याची तक्रार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 मार्च 2018

भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी आपली काॅलर धरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजप सोशल मिडीया सेलचे प्रदेश सहसंयोजक शरद झांबरे यांनी एमआयडिसी पोलिस स्टेशनला दिली आहे. 

अकोला : भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी आपली काॅलर धरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजप सोशल मिडीया सेलचे प्रदेश सहसंयोजक शरद झांबरे यांनी एमआयडिसी पोलिस स्टेशनला दिली आहे. 

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील खासदार संजय धोत्रे विरुद्ध गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गटाचा वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातुनच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता डाॅ. रणजित पाटील यांचे समर्थक असलेले भाजप सोशल मिडीया सेलचे प्रदेश सहसंयोजक शरद झांबरे यांनी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्याविरूद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय भुपूष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी अकोला विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री डाँ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व इतरही अनेक नेते व कार्यकर्ते हजर होते. त्याच दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांनी माझी काॅलर पकडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शरद झांबरे यांनी एमआयडिसी पोलिस स्टेशनला दिली आहे. आमदार सावरकर यांच्या पासून आपल्या व परिवाराच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झांबरे यांनी केली आहे. 

स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी पक्षातंर्गत वादातुन विरोधकांकडून चर्चेत राहण्यासाठी असे खालच्या पातळीवर जाण्याचे प्रकार घडत आहेत. मी त्याला घाबरत नाही. विरोधक आपली पातळी सोडत असुन हाच त्याचा नैतिक पराभव आहे

- आमदार रणधीर सावरकर 
 

संबंधित लेख