रामदास आठवलेंच्या दौऱ्याने पिंपरीत राजकीय वादळ

नेहमी अगदी संसदेतही कविता, शेरोशायरी करणारे आणि खरपूस शैलीत बोलणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मूड कालच्या -चिंचवड दौऱ्यात एकदम गंभीर व राजकीय होता. त्यांनी पिंपरी या राखीव मतदारसंघातून पक्षाच्या प्रदेश सचिव आणि माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना निवडून आणणार असण्याचे जाहीर केल्याने तेथून गुडघ्याला बाशिंग बसून बसलेल्या भाजप इच्छुकांची आताच विकेट पडली.
रामदास आठवलेंच्या दौऱ्याने पिंपरीत राजकीय वादळ

पिंपरी : नेहमी अगदी संसदेतही कविता, शेरोशायरी करणारे आणि खरपूस शैलीत बोलणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मूड कालच्या -चिंचवड दौऱ्यात एकदम गंभीर व राजकीय होता. त्यांनी पिंपरी या राखीव मतदारसंघातून पक्षाच्या प्रदेश सचिव आणि माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना निवडून आणणार असण्याचे जाहीर केल्याने तेथून गुडघ्याला बाशिंग बसून बसलेल्या भाजप इच्छुकांची आताच विकेट पडली. आठवलेंचे हे एक वाक्य शहर भाजपमध्ये वादळ निर्माण करणारे ठरले आहे.

सामाजिक सलोखा परिषदेसाठी आठवले पिंपरीत आले होते. त्यातून त्यांनी कोरेगाव भीमा घटनेनंतर मराठा, दलित समाजात पसरलेला गैरसमज दूर करीत सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याअगोदर घेतलेल्या पत्रकार परिषदेतील त्यांच्या वरील वक्तव्याने शहरातील राजकीय सलोखा मात्र बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात व विशेषकरून भाजपमध्ये वादळ नाही, तरी वावटळ मात्र उठली आहे. आठवलेंनी पिंपरीवर दावाच केला नाही, तर हक्कही सांगितला. तसेच तेथून गतवेळी अडीच हजारांनी  पराजित झालेल्या आपल्या त्याच उमेदवाराला पुन्हा पिंपरीतून 15 ते वीस हजारांनी निवडून आणू, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे भाजप व इतर पक्षांच्याही उमेदवारांचे धाबे काहीसे आताच दणाणले आहे.

शिवसेनेने युती तोडल्यामुळे आगामी निवडणुकीला आरपीआयसह इतर पक्षांना भाजप निश्चीत जवळ करणार आहे. त्यात आऱपीआयशी त्यांची युती अगोदरपासूनच आहे.त्यातूनच त्यांनी आठवले यांना राज्यसभेवर घेतले. एवढेच नाही, तर त्यांना मंत्रीही केले आहे. त्यामुळे आऱपीआयची  युती भाजप तोडण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे आठवले यांनी काल पिंपरीवर हक्क सांगितल्याने ती जागा त्यांच्याकडे गेल्यात जमा आहे. त्यातून त्यावरील दावा भाजपला आता सोडावाच लागणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून तयारी करीत असलेल्या पक्षाच्या इच्छुकांची विकेटच पडली आहे. 

त्यातही भाजपच्या पिंपरी पालिकेच्या दोन दिवसांपूर्वीच पायउतार झालेल्या स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांचा मोठा हिरमोड झाला आहे. त्या यावेळीच नव्हे, तर गेल्यावेळीही येथून तीव्र इच्छूक होत्या. तेव्हा त्या शिवसेनेत होत्या. त्यांना त्यावेळी शिवसेनेने उमेदवारी दिली नव्हती. तेथेच त्या शिवसेनेतून बाहेर पडण्याची बीजे रोवली गेली होती. आताही त्यांची तशीच स्थिती भाजपमध्ये झाली आहे. येथील उमेदवारीसाठी त्यांनी भल्याभल्यांना शिंगावर घेतले होते. आपल्याच पक्षाचे खासदार आणि जुने एकनिष्ठ भाजपाई अमर साबळे यांच्यावरही त्यांनी तीव्र टीकेचा भडीमार केला होता.

सावळेंबरोबर खासदार साबळेंचाही हिरमोड आठवलेंच्या वक्तव्याने झाला आहे. त्यामुळे या दोन्ही 'एस'ला उमेदवारीचा 'नो' मिळाल्यात जमा आहे. साबळे हे आपली मुलगी वेणू हिला पिंपरीतून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी तेथील आपल्याच पक्षाच्या इच्छुक सावळे यांच्या स्थायीतील कारभाराविरुद्ध थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली होती. त्यामुळे त्यांनाही आपली तलवार आता म्यान करावी लागणार आहे. ती ते सहजपणे म्यान करतील,यात शंकाही नाही. प्रश्न आहे, तो आक्रमक आणि मानी स्वभावाच्या सावळे यांचा. त्या माघार घेतात, की पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी मिळवितात, हे पाहणे औत्सुक्याचे ठऱणार आहे. तसेच भाजपकडून इच्छूक असलेले राष्ट्रवादीचे पिंपरीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांची भुमिका काय राहते, त्यावरही पिंपरीचे समीकरण बिघडणार की जुळणार हे अवलंबून राहणार आहे.

"शिवसेनेला महायुतीत आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू, त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती करू,'' या आठवले यांच्या दुसऱ्या वाक्याने पिंपरीतील शिवसेनेच्या इच्छुकांच्याही पोटात गोळा आला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, येथे कुणीही कुणाचा कायम शत्रू वा मित्रही नसतो, या सुरात आठवले दुसरे वाक्य बोलले. त्यामुळे तुटलेली युती पुन्हा जुळली, तर शिवसेनेच्या पिंपरीतील इच्छूकांनाही गाळा गुंडाळावा लागणार आहे. येथे, तर त्यांचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुती झाली, तर त्यांना ही जागा सोडणे भाजपपेक्षाही कितीतरी जड जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com