Marathi Political News NCP Western Maharashtra Hallabol | Sarkarnama

एप्रिलमध्ये राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल 

उत्तम कुटे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादीचा हल्लाबोल आता पश्‍चिम महाराष्ट्रात होणार आहे. विदर्भातून गेल्यावर्षी 1 डिसेंबरला सुरू झालेले राज्य व केंद्र सरकारविरुद्धचे राष्ट्रवादीचे हे आंदोलन 2 एप्रिलपासून ऐन कडक उन्हाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. त्याची व्युव्हरचना काल पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत केली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक तीव्र व जोरदारपणे हे आंदोलन करण्याचे नक्की करण्यात आले. 

पिंपरी : राष्ट्रवादीचा हल्लाबोल आता पश्‍चिम महाराष्ट्रात होणार आहे. विदर्भातून गेल्यावर्षी 1 डिसेंबरला सुरू झालेले राज्य व केंद्र सरकारविरुद्धचे राष्ट्रवादीचे हे आंदोलन 2 एप्रिलपासून ऐन कडक उन्हाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. त्याची व्युव्हरचना काल पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत केली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक तीव्र व जोरदारपणे हे आंदोलन करण्याचे नक्की करण्यात आले. 

कोल्हापूरपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सुरू होणार आहे. त्याचा शेवट पुणे जिल्ह्यात होणार आहे. तर,शेवटचा हल्लाबोल हा कोकणात केला जाणार आहे. यवतमाळ ते वर्धा आणि नंतर नागपूर या दोन्ही टप्यांत हल्लाबोल यशस्वी झाला. त्यानंतर 12 डिसेंबरला नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सभेलाही मोठी गर्दी झाली. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रानंतर हे आंदोलनाचे हे वादळ आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. येथे ते अधिक तीव्र व उग्र करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना महिनाभर अवधी मिळाला आहे. 

संसद व राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे नेते तेथे अडकून पडले आहेत. त्यामुळे मराठवाड्यानंतर लगेचच हल्लाबोलचा पुढचा टप्पा घेता आला नाही. परिणामी ही दोन्ही अधिवेशने संपल्यानंतर मोठी 'गॅप' घेत एप्रिलमध्ये हे आंदोलन पुन्हा सुरू होत आहे. ते पश्‍चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्याच्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे. यामुळे आता आम्हाला अधिक वेळ मिळणार असून जोरदार तयारी करता येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि सरचिटणीस फजल शेख यांनी सांगितले. 

मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला सांगली,सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष व पदाधिकारी मुंबईतील बैठकीला हजर होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवडमधून शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, सरचिटणीस फजल शेख, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम नाना काटे, दत्ताकाका साने, संजय वाबळे,ज्येष्ठ नेते हनुमंतराव गावडे, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी कार्याध्यक्ष योगेश शेट्टी, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर या बैठकीला हजर होते. माजी महापौर,माजी शहराध्यक्ष व पालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, मात्र गैरहजर होते. आजारपणामुळे ते येऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले. 

2 ते 12 एप्रिल असे दहा दिवस हा हल्लाबोल पश्‍चिम महाराष्ट्रात होणार आहे. त्यात सर्वाधिक तीन दिवसांचा कालावधी पुणे जिल्ह्याला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दोनही जाहीर सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहेत. त्याला अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनाही या सभेसाठी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

संबंधित लेख