Marathi Political News Nashik Swabhimani Sadabhau Khot | Sarkarnama

स्वाभिमानीची कधी सदाभाऊंवर दगडफेक; नाशिकला मात्र गायले गुणगान! 

संपत देवगिरे 
रविवार, 4 मार्च 2018

ऊसाचा दर असो वा शेतकरी संपांतील फूट; याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यंतरी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. नाशिकला मात्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पगार यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गुणगान करीत त्यांचे अभिनंदन केले.

नाशिक : ऊसाचा दर असो वा शेतकरी संपांतील फूट; याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यंतरी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. नाशिकला, मात्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पगार यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गुणगान करीत त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील विसंवाद उघड झाला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील कांदा चाळींसाठी अनुसूचित जाती, भटक्‍या जमातींसाठी दहा कोटी आणि खुल्या गटातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांच्या अनुदानासाठी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामुळेच राज्यमंत्री खोत यांच्या माध्यमातुन अनुदान उपलब्ध झाल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पगार यांनी सोशल मिडीयावर केला आहे. त्यासाठी त्यांनी खोत यांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले आहे. विविध ग्रुपवर हा संदेश फिरत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणुन मंत्रीमंडळात असतांना शेतकरी संपाविषयी वेगळी भूमिका घेत संपात फूट पाडल्याचा आरोप खोत यांच्यावर विविध संघटनांनी केला होता. पश्‍चिम महाराष्ट्रात तर खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांचा खासदार राजु शेट्टी यांनी सत्कार केला होता. त्यामुळे सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विळ्या भोपळ्याचे नाते असताना नाशिकच्या अध्यक्षांनी मात्र कांदा चाळीच्या अनुदानाचे श्रेय घेण्यासाठी सदाभाऊंचे अभिनंदन केल्याने त्याची चर्चा व्हायला लागली आहे.  
 

खोत हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांच्यामुळेच कांदा चाळींसाठी अनुदान मिळाले. ते चांगले काम करीत आहेत. कांदा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांचे प्रश्‍न असल्यावर आम्हाला सरकारकडेच जावे लागते. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे.

दीपक पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्ष, नाशिक जिल्हा. 
... 
मंत्री असो वा नसो दरवर्षी कांदा चाळींना अनुदान मिळतेच. उलट सध्याच्या सरकारने लॉटरी पध्दत सुरु केल्याने कांदा उत्पादकांवर अन्याय होतो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सटाण्याच्या पदाधिकाऱ्यांना लांगुल चालन करण्याची सवय आहे. फोट सेशन पुरतेच त्यांचे आंदोलन असते.

खेमराज कोर, शेतकरी नेते. 

संबंधित लेख