Marathi Political News Nashik Sena Council Election | Sarkarnama

नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला पाचव्यांदा होतोय अपशकुन?

संपत देवगिरे 
रविवार, 4 मार्च 2018

येत्या मे महिन्यात होणा-या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखविला गेला आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क सुरु केला. मात्र, अचानक गतवेळी समसमान मते मिळुन लाॅटरी पध्दतीने संधी हुकलेले शिवाजी सहाणे यांनीही उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे सलग पाच वेळा सतत संधी हुकलेल्या शिवसेनेला यंदा स्वपक्षातूनच आव्हान मिळते की काय, अशी स्थिती आहे. 

नाशिक : येत्या मे महिन्यात होणा-या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखविला गेला आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क सुरु केला. मात्र, अचानक गतवेळी समसमान मते मिळुन लाॅटरी पध्दतीने संधी हुकलेले शिवाजी सहाणे यांनीही उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे सलग पाच वेळा सतत संधी हुकलेल्या शिवसेनेला यंदा स्वपक्षातूनच आव्हान मिळते की काय, अशी स्थिती आहे. 

नाशिक विधान परिषदेची निवडणूक आणि योगायोग यांचा गेल्या पाच निवडणुकांत पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. 1994 मध्ये युतीची सत्ता असताना व पुरेसे मतदार असतांना अपक्ष शांताराम तात्या आहेर यांनी काँग्रेसला  झटका देत विजय संपादन केला. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघे दोन मतदार असतांना देविदास पिंगळे यांनी विजय संपादन केला. त्यानंतर सलग तीन निवडणुकांत राष्ट्वादी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला. गतवेळी शिवसेनेचे शिवाजी सहाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य जयंत जाधव यांना समसमान मते मिळाली. मात्र लाॅटरीमध्ये सहाने यांची संधी हुकली. त्यानंतर न्यायालयात निकाल सहाने यांच्या बाजुने निकाल लागला. मात्र कालापव्यय एव्हढा झाला की मुदत संपली. 

या पार्श्वभूमीवर यंदा दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहिर केली आहे. त्यांनी प्रचार सुरु केला आहे. मात्र, चार दिवसांपासून शिवसेनेचे सहाने यांनीही सोशल मिडीयावर 'यंदा न्याय हवा' असे सांगत मतदारसंघांचे प्रश्न, जाहिरनामा स्वरुपात मतदारांना आवाहन करणे सुरु केले आहे. या स्थितीत सलग पाचव्यांदा शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ, विरोधकांची फाटाफुट अशी अनुकुलता असताना घरातुनच नाराजी उघड झाल्याने अपशकुन होतो की काय अशी स्थिती आहे. 

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १९१ मतदारांसह शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल भाजपची मतदारसंख्या १६६ आहे. दोन्ही काँग्रेसकडे 150 सदस्य असुन माकप, जनता दल, एमआयएम, मनसे यांची 28 मते आहेत. याशिवाय 31 अपक्ष सदस्य आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते यावर अंतिम चित्र व विजयाचे गणित असेल. विरोधी पक्षांनी अपशकुन केला नाही तर शिवसेनेला यंदा येथे विजय़ाची संधी आहे. त्यात कोण काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान कोकणासह विदर्भ व मराठवाड्यातील चार ते पाच जागांच्या निवडणुका होणार असून कोकणात शिवसेनेला भाजपची नाशिकप्रमाणेच तर विदर्भ व  मराठवाड्यात भाजपला शिवसेनेची मदत घेतली तरच जागा मिळवणे शक्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे कदाचित या निवडणुकीत या दोन पक्षांचे मनोमिलन होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मातोश्रीकडुन मला यंदा निश्चित न्याय मिळेल. उमेदवारी मिळाल्याने गत निवडणुकीतील अन्यायाचे परिमार्जन होईल. त्याबाबत माझा पक्षनेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे - शिवाजी सहाने, माजी नगरसेवक.

मी पक्षाच्या विजयासाठी कार्यरत आहे. मतदारसंपर्क सुरु केला आहे. यंदा शिवसेनेसाठी ही जागा प्रतिष्ठेची असल्याने विजय निश्चित आहे - नरेंद्र दराडे, माजी अध्यक्ष, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
 

संबंधित लेख