Marathi Political News Nashik CP Rangpanchami | Sarkarnama

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल रंगले रंगपंचमीत

संपत देवगिरे 
मंगळवार, 6 मार्च 2018

नेहमीच गस्त, शिस्त व बंदोबस्त यातंच गुंतुन पडलेल्या पोलीसांसाठी रविवार वेगळाच ठरला. सकाळी सकाळी सर्वांना मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश नियंत्रण कक्षाकडून आल्याने अनेकांना कामाचा ताण आठवला. मात्र प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर मिळालेल्या सरप्राईजने सगळेच हरखुन गेले. मुख्यालयात जाऊन पाहतात, तर तयारी वेगळीच होती.

नाशिक : नेहेमीच बंदोबस्त, सुरक्षा अन्‌ 'तपास सुरु आहे'च्या संवादात हरवणारे नाशिकचे पोलिस कर्मचारी रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला 'खाकी' ऐवजी विविध रंगांत रंगले. संगीताच्या तालावर थिरकले. त्यात वरिष्ठांनी प्रोत्साहन तर दिलेच. शिवाय विविध सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेणारे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनीही वरिष्ठ- कनिष्ठची व्याख्या बाजुला ठेवत सहकाऱ्यांना रंगविल्याने यंदा पोलिसांचीही रंगपंचमी जोमात झाली. यावेळी सहकाऱ्यांनी आयुक्तांना रंगवत खांद्यावर घेऊन ठेकाही धरला. 

नेहमीच गस्त, शिस्त व बंदोबस्त यातंच गुंतुन पडलेल्या पोलीसांसाठी रविवार वेगळाच ठरला. सकाळी सकाळी सर्वांना मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश नियंत्रण कक्षाकडून आल्याने अनेकांना कामाचा ताण आठवला. मात्र प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर मिळालेल्या सरप्राईजने सगळेच हरखुन गेले. मुख्यालयात जाऊन पाहतात, तर तयारी वेगळीच होती. पाण्याने भरलेले पिंप, बादल्या, रंगाने भरलेली ताटे, तयारीत असलेला पोलीस बॅंड, साऊंड सिस्टीम..... हळूहळू सर्व हजर झाले. सगळ्यांना पोलीस आयुक्तांची प्रतिक्षा होती. थोड्याच वेळात तेही सहकुटुंब आले. अन्‌ मग सुरू झाली पोलीसांची रंगपंचमी. 

पोलीस आयुक्त सिंगल यांचा आणखी एक आनंदाचा धक्का सर्वांना थक्क करुन गेला. मंगळवारी रंगपंचमीचा बंदोबस्त असणार. मग पोलीस बांधवांना रंगपंचमी साजरी करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी रविवारी रंगोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली. अन्य सहकाऱ्यांनी ती प्रत्यक्षात आणली. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व वरीष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी त्यात सहभागी झाले. एकमेकांना रंग लावतानाच गाण्यांच्या तालावर पोलीस आयुक्तांसह सर्वांनीच ठेका धरला होता. 

संबंधित लेख