Marathi Political News Nagpur Fraud NCP | Sarkarnama

प्रफुल पटेल यांची ओळख असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या नेत्याने 25 लाखांना गंडविले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ओळख असल्याचे सांगत नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर याच्या विरोधात 25 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायलटची नोकरी लावून देण्यासाठी ही रक्कम सुंदरकर याने एका युवकाकडून उकळली आहे.

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ओळख असल्याचे सांगत नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर याच्या विरोधात 25 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायलटची नोकरी लावून देण्यासाठी ही रक्कम सुंदरकर याने एका युवकाकडून उकळली आहे.

रमेश अजाब खोरगडे असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांचा मुलगा विनय खोरगडे याने 2011 मध्ये पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. 2013 मध्ये जेट एअरवेजमध्ये पायलट भरतीची जाहिरात प्रकाशित झाली. त्यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल होते. काहींनी प्रल्हाद सुंदरकर यांना भेटण्याचे खोरगडे यांना सुचविले. 'आपली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चांगली ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देतो. यासाठी 25 लाख रुपये खर्च करावे लागतील,' असे सुंदरकरने खोरगडे यांना सांगितले. या आमिषाला बळी पडून मुलाच्या नोकरीसाठी कसे तरी जुळवाजुळव करून खोरगडे कुटुंबियाने 25 लाख रुपये सुंदरकरला दिले.

मात्र, जेट एअरवेजने घेतलेल्या लेखी चाचणीत विनय खोरगडे यांचे नाव नव्हते. यामुळे जेट एअरवेजमध्ये त्यांना नोकरी न मिळाल्याने सुंदकरकडे पैशासाठी तगादा लावणे सुरू केले. सुंदरकर पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत होता. अनेकदा मागणी करून सुंदरकरने पैसे परत न केल्याने अखेर खोरगडे यांनी अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात सुंदरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पथकाला तो घरी आढळला नाही. प्रल्हाद सुंदरकरला 25 लाख रुपये दिल्याचा व्हिडीओ उपलब्ध असल्याचा दावा खोरगडे यांनी केला आहे.

संबंधित लेख