Marathi Political News Nagpur Congress Kamalnath | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

नागपूर काँग्रेसचे बंडखोर नेत्यांची दिल्लीवारी होणार 'व्हाया छिंदवाडा'

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बंडखोर गटाचे नेते दिल्ली गाठणार आहे. यासाठी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व छिंदवाडयाचे खासदार कमलनाथ यांची मदत घेणार असल्याचे समजते.

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बंडखोर गटाचे नेते दिल्ली गाठणार आहे. यासाठी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व छिंदवाडयाचे खासदार कमलनाथ यांची मदत घेणार असल्याचे समजते.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना आव्हान देणाऱ्या सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर आपली बाजू भक्कम करण्याचे प्रयत्न या बंडखोर गटाने सुरू केले आहे. यासाठी ते दिल्लीत प्रस्थ असलेल्या कमलनाथ यांची मदत घेणार आहेत. 

सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे कमलनाथ यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. सावनेर मतदारसंघ छिंदवाडा मतदारसंघाला लागून असल्याने अनेक मराठी भाषिकही छिंदवाडा मतदारसंघात येतात. कमलनाथ यांच्या निवडणुकीत मराठी भाषक भागामध्ये आमदार सुनील केदार मोठी भूमिका बजावत असतात. हे संबंध लक्षात घेताना गेल्या रविवारी सर्व बंडखोरांनी छिंदवाडा येथे जाऊन कमलनाथ यांची भेट घेतली. खासदार कमलनाथ यांची शिष्टाई आता किती कामी येईल, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. 

कमलनाथ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे माजी मंत्री नितीन राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना आव्हान देण्याचे ठरविले आहे. नितीन राऊत यांनी थेट नागपूर लोकसभा मतदारसंघावरच दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. चतुर्वेदी यांच्या विश्‍वासातील म्हणून नितीन राऊत ओळखले जातात. राऊत यांनाही कारणे दाखवा नोटीस मिळेल, असे बोलले जात होते. परंतु, राजकीय कारणांवरून काँग्रेसच्या नेत्यांनी राऊत यांना अभय दिले. आता राऊत यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. 

गेल्या निवडणुकीत विलास मुत्तेमवार यांचा पराभव झाला होता. तरीही मुत्तेमवार यांनी पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे. कमलनाथ यांच्या पाठिंब्यामुळे नितीन राऊत यांना नागपूर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे. आता कमलनाथ यांचे राहुल गांधी यांच्याकडे किती प्रस्थ आहे, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. परंतु, नागपुरातील बंडखोरांनी दिल्ली गाठण्यासाठी व्हाया छिंदवाडा जाणे ठरविले आहे, हे निश्‍चित.
 

संबंधित लेख