Marathi Political News Nagpur BJP Navneet Rana | Sarkarnama

भाजपची आता नवनीत राणांना गळ?

सुरेंद्र चापोरकर 
गुरुवार, 1 मार्च 2018

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती होण्याची शक्‍यता नसल्याने भाजपने नव्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून परंतु भाजपकडे सक्षम उमेदवाराची वानवा आहे. भाजपकडे आता उमेदवारांचा दुष्काळ असल्याने नवनीत राणा यांनाच गळ घातली जाणार आहे. त्यांच्या ग्लॅमर व जनसंपर्काचा भाजपला फायदा होईल, असा कयास लावला जात आहे.

अमरावती : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष प्रसिद्ध अभिनेत्री व आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनाच गळ घालणार असल्याचे बोलले जात आहे. नवनीत राणा यांच्याबद्दल असलेले पूर्वग्रह आता नाईलाजाने भाजपला दूर ठेवावे लागत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती होण्याची शक्‍यता नसल्याने भाजपने नव्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून परंतु भाजपकडे सक्षम उमेदवाराची वानवा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध तोडून टाकले आहेत. आमदार रवि राणा यांनी भाजपशी संधान बांधून नवनीत राणा यांच्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणाच्या प्रवेशाला विरोध केला होता. 

भाजपकडे आता उमेदवारांचा दुष्काळ असल्याने नवनीत राणा यांनाच गळ घातली जाणार आहे. त्यांच्या ग्लॅमर व जनसंपर्काचा भाजपला फायदा होईल, असा कयास लावला जात आहे. काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने त्यांचा अनुसूचित जातीचा दाखला राज्य जात पडताळणी समितीने वैध ठरविला आहे. यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही आता सौम्य भूमिका घेतली आहे. आमदार रवि राणा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या मार्फत दिल्लीतून फिल्डिंग लावल्याचे समजते.

शिवसेनेचे उमेदवार म्हणून आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. अडसूळ यांच्याबद्दल आता नाराजी वाढू लागली आहे. या नाराजीचा फायदा नवनीत राणा यांना मिळू शकतो. त्यांनी 2014 मध्ये लोकसभा लढविल्याने मतदारांना त्यांचा चेहरा ओळखीचा झाला आहे. काँग्रेसच्या मदतीने रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवई यांच्याऐवजी आता काँग्रेसनेच किशोर बोरकर यांना उमेदवारी देण्यावर विचार सुरू आहे. बोरकर अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष असून अपंगासाठी कार्य करीत आहेत. काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीसाठी हात समोर केल्याने राजेंद्र गवईसोबत आघाडी होण्याची शक्‍यता नाही.
 

संबंधित लेख