Marathi Political News Nagar Shivsena Lanke Auti | Sarkarnama

निलेश लंके यांचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात

मुरलीधर कराळे
रविवार, 4 मार्च 2018

पारनेर येथे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी केलेले शक्तीप्रदर्शन व नंतर आमदारांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी आता ठाकरे हेच योग्य तो निर्णय घेणार आहेत. त्यामुळे लंके यांना काहीच प्रतिउत्तर देऊ नका, असा सबुरीचा सल्ला आमदार औटी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याने आमदारांच्या 'वेट अॅण्ड वाॅच' भूमिकेमागे काय दडलेय, याची उत्सुकता पारनेरकरांना लागली आहे.

नगर : पारनेर येथे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी केलेले शक्तीप्रदर्शन व नंतर आमदारांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी आता ठाकरे हेच योग्य तो निर्णय घेणार आहेत. त्यामुळे लंके यांना काहीच प्रतिउत्तर देऊ नका, असा सबुरीचा सल्ला आमदार औटी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याने आमदारांच्या 'वेट अॅण्ड वाॅच' भूमिकेमागे काय दडलेय, याची उत्सुकता पारनेरकरांना लागली आहे.

झालेल्या प्रकाराबाबत चर्चा करण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेचे तालुक्यातील नेते, युवक कार्यकर्त्यांनी काल आमदार औटी यांची भेट घेऊन जसास तसे उत्तर देण्याची मागणी केली. त्यावर औटी यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत 'वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका घेतली.

औटी कार्यकर्त्यांना म्हणाले, ''आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात पक्षप्रमुख ठाकरे आले होते. मात्र लंके यांनी मुद्दाम उशिरा येऊन पक्षाचे सर्व शिष्टाचार पायदळी तुडवित ठाकरे यांच्यासमोरच लोकांमधून कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून येऊन शक्तीप्रदर्शन केले. एव्हढ्यावरच ते थांबले नाही, तर ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लंके समर्थकांकडून घोषणाबाजी झाली. पक्षप्रमुखांनीच त्याची दखल घेतल्याने हा प्रकार बंद झाला असला, तरी त्यामुळे पक्षप्रमुखांसमोर नाचक्की झाली. एव्हढे करून लंके समर्थक थांबले नाही, तर ठाकरे हॅलिपॅडकडे जात असताना आपल्या गाडीवर दगडफेक करून काच फोडली. झालेला हा प्रकार योग्य नसला, तरी तालुक्याची संस्कृती तशी नाही. (कै.) भास्करराव औटी यांनी आपणास सुसंकृतपणाचा वारसा दिला आहे. तो जपण्याची आपली जबाबदारी आहे. लंके समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारीत केलेल्या संदेशावर प्रत्युत्तर देऊ नका.'' आपण कायदा मानणारे आहोत. कायदा हातात घेऊ नका, असा सल्लाही औटी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लंके समर्थकांकडे दुर्लक्ष करा. त्यांचा हा प्रकार स्वतः पक्षप्रमुखांनीच पाहिल्यामुळे ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतील, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिल्यामुळे पारनेरमध्ये उठलेले शिवसेनेतील वादळ सध्या तरी शमले आहे.

संबंधित लेख