Marathi Political News Nagar Mayor Election | Sarkarnama

घालीन लोटांगण भाजपाच्या दारी; उपमहापौर पद द्या हो शिवसेनेच्या घरी

मुरलीधर कराळे
शनिवार, 3 मार्च 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने तुरुंगात गेलेल्या भाजपच्या श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांची नाचक्की झाली. त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपण उपमहापौरपदाच्या निवडीमध्ये उतरणार नाही, असे भाजप नेत्यांनी घोषित केले. केवळ एव्हढीच घोषणा महत्त्वाची नाही, तर कोणाला पाठिंबा द्यायचा हे भाजप नेते नंतर सांगतील, असे सांगितल्याने शिवसेनेची मोठी पंचाईत झाली आहे.

नगर : महानगर पालिकेतील उपमहापौरपदाची निवड सोमवारी होणार आहे. भाजपच्या वाट्याला असलेल्या या पदावर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने पेच अधिकच वाढला आहे. भाजपने पाठिंबा दिला नाही, तर शिवसेनेलाही हे पद मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयात काल सायंकाळी तळ ठोकला. तुम्हाला उपमहापौरपद नको असले, तरी किमान शिवसेनेला तरी मिळावे, म्हणून या नगरसेवकांनी भाजप नेत्यांची मनधरणी केली. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने अखेर आज शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यावर मार्ग काढणार असल्याचे समजते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने तुरुंगात गेलेल्या भाजपच्या श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांची नाचक्की झाली. त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपण उपमहापौरपदाच्या निवडीमध्ये उतरणार नाही, असे भाजप नेत्यांनी घोषित केले. केवळ एव्हढीच घोषणा महत्त्वाची नाही, तर कोणाला पाठिंबा द्यायचा हे भाजप नेते नंतर सांगतील, असे सांगितल्याने शिवसेनेची मोठी पंचाईत झाली आहे. भाजपने पाठिंबा दिला नाही, तर शिवसेनेचाही उपमहापौर होऊ शकणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढून या पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल, हे उघड झाले. त्यामुळे भाजपशी सलगी करण्यातच भलाई असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे नेते दिलीप गांधी यांच्या कार्यालयाचा रस्ता धरला.

काल दुपारनंतर खासदार गांधी यांच्या कार्यालयात शिवसेनेचे नेते संभाजी कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, गणेश कवडे, सचिन जाधव, संजय शेंडगे व उपमहापौर पदाचे उमेदवार अनिल बोरुडे गेले. या वेळी उपस्थित असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. उपमहापौरदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा मिळावा, म्हणून या नगरसेवकांनी विनंती केली, मात्र याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी काहीही तोडगा न काढता तेथून काढता पाय घेतला. त्यानंतरही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, तोडगा निघू शकला नाही. याबाबत आज शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड तोडगा काढणार असल्याचे समजते.

शिवसेनेशी पंगा भाजपला महागात पडेल
राज्यात शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले असले, तरी स्थानिक पातळीवर उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेशी पंगा घेऊन जमणार नाही. भाजपमध्ये आधीच दोन गट एकमेकांचे प्रखर विरोध करणारे आहेत. त्यात लोकसभेच्या निवडणुकीत खासदार गांधी यांना शिवसेनेचीच मोठी मदत झालेली आहे. नगर शहरातून शिवसेनेने दिलेले 'लिड' महत्त्वाचे आहे. अॅड. अभय आगरकर यांच्या गटाला तोंड देताना शिवसेनेचेही मोठे शत्रुत्त्व पत्करणे भाजपच्या गांधी गटाला महागात पडू शकते. 

त्यामुळे निवडणुकीत उमेदवार न देऊन माघार घेतली असली, तरी शिवसेनेला पाठिंबा न देणे अधिक महागात पडेल. त्यामुळे भाजप शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देईल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.

उपमहापौर शिवसेनेचाच होणार : फुलसाैंदर
''उपमहापौर पदासाठी भाजप दावेदार असला, तरी त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनिल बोरुडे यांना संधी देण्यात आली आहे. भाजप नेत्यांशी काल शिवसेनेच्या नगरसेवकांनी चर्चा केली. काल त्यावर तोडगा निघाला नसला, तरी आज शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल. भाजप शिवसेनेला पाठिंबा देऊन अनिल बोरुडे हेच उपमहापौर होतील,'' असा विश्वास शिवसेनेचे नेते व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख