Marathi Political News Nagar Dy Mayor Election | Sarkarnama

राष्ट्रवादी व शिवसेनेत नगरच्या उपमहापौरपदाची खेचाखेची

मुरलीधर कराळे
रविवार, 4 मार्च 2018

नगर : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून शिमगा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व बंडखोर गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने केवळ नऊ महिन्यांसाठीच्या या पदासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 

नगर : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून शिमगा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व बंडखोर गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने केवळ नऊ महिन्यांसाठीच्या या पदासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 

उद्या (सोमवारी) निवडणूक होणार असल्याने आजची रात्र पक्षीयदृष्ट्या वैऱ्याची ठरणार आहे. येत्या चोवीस तासांत कोण कोणाला साथ देते, यावरच रंगपंचमीचे रंग कोण उधळणार हे ठरणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून तुरुंगात गेलेला श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच भाजपनेही त्याची पक्षातून हकालपट्टी केली. एव्हढचे नाही, तर या प्रकाराचे प्रायश्चित्त म्हणून भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. उद्या (ता. ५) होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, काँग्रेसच्या मुदस्सर शेख, राष्ट्रवादीचे विपुल शेटीया, अरिफ शेख, समद खान, तर मनसेच्या वीणा बोज्जा या सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापालिकेत सध्या राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेल्या शहर विकास आघाडीचे २१, शिवसेनेचे १९, काँग्रेसचे १०, भाजप ८, मनसेचे ४ व अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. पक्षातील काही नगरसेवकांनी बंडखोर गट केला असून, त्यामध्ये दहा नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. पक्षातून बंडखोर झालेल्यांची मनधरणी पक्षातील प्रमुख नेते करीत आहेत. त्याबाबत आज संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यात बैठकी होणार आहेत.

राठोड व जगताप यांची प्रतिष्ठा पणाला
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे पद आपल्याकडे असावे, यासाठी दोघांनीही जोरदार मोर्चेबांधी केली आहे. शिवसेनेचे १९ नगरसेवक आहेत. काही अपक्ष शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. परंतु, आपले काही नगरसेवक ऐनवेळी फुटू नये म्हणून शिवसेनेने त्यांना अज्ञातस्थळी हलविल्याचे समजते.

शिवसेनेच्या वतीने अनिल बोरूडे व दीपाली बारस्कर यांनी अर्ज भरले असले, तरी बारस्कर यांना माघार घेण्याबाबत पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न सुरू आहेत. बारस्कर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी होऊन अनिल बोरुडे हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विपुल शेटीया, समद खान व अरिफ शेख यांनी अर्ज भरला आहे. त्यातील समद खान यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे उर्वरीत दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे आज ठरेल. राष्ट्रवादीप्रणीत शहर विकास आघाडीकडे २१ नगरसेवक असले, तरी बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. बंडखोर गटामध्ये काँग्रेसचे मुदस्सर शेख यांचेही नाव पुढे येत आहे. एकूणच आमदार जगताप यांना मतांची जुळवाजुळव करण्यात मोठी कसरत करावी लागणार आहे.

संबंधित लेख