Marathi Political News Mahesh Zagage Transfer | Sarkarnama

200 कोटींचा जमिन घोटाळा उघड केल्याने आयुक्त महेश झगडेंची बदली? 

संपत देवगिरे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थानच्या 75 हेक्‍टर जमिनी घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायिक व देवस्थानच्या विश्‍वास्तांनी सुमारे दोनशे कोटींचा जमिन गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार उघडकीला आणल्याने झगडे यांची बदली केली गेली असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आहे. 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थानच्या 75 हेक्‍टर जमिनी घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायिक व देवस्थानच्या विश्‍वास्तांनी सुमारे दोनशे कोटींचा जमिन गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार उघडकीला आणल्याने झगडे यांची बदली केली गेली असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आहे. 

आज राज्याचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी विशेष आदेश काढला. या आदेशानुसार झगडे यांची, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माने यांची नियुक्ती करण्यासाठी विभागीय महसुल आयुक्त हे पद अवनत करण्यात आले आहे. झगडे सध्या निवृत्तीच्या वाटेवर असून सामान्यतः नियुक्तीच्या वेळी पसंतीची नियुक्ती दिली जाते. झगडे यांनी नाशिकला त्यासाठीच बदली स्विकारली होती. मात्र, अचानक त्यांची बदली झाल्याने हा वादाचा व चर्चेचा विषय ठरण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या शुक्रवारी विधानसभेत त्र्यंबकेश्‍वर येथील देवस्थानच्या जमिनीविषयी आमदार तृप्ती सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर तयार करताना महसुल यंत्रणेने आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन या जमिनीच्या व्यवहाराला नियमित करण्यासाठी मदत केल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये नाशिकचा एक बांधकाम व्यवसायिक तसेच राज्य सरकारला पाठींबा दिलेल्या एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे नाव घेतले जात होते. 

विशेष म्हणजे महसुल राज्यमंत्र्यांनीही त्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे सध्या त्याबाबत महसुलमंत्र्यांकडे त्याच्या अपीलाची सुनावणी सुरु आहे. कोलंबिका देवस्थानच्या 75 एकर जमिनीचे बांधकाम व्यवसायिक सचिन दप्तरी यांना हस्तांतर करण्यासाठी त्याला कुळ कायदा तसेच अन्य नियम लागू नसतांना नियमबाह्य व्यवहार झाल्याचा ठपका होता. त्यात नायब तहसीलदार एम. एम. निरगुडे, सर्कल अधिकारी, तलाठी यांसह विश्‍वस्त महाजन कुटुंबिय अशा तेवीस जणांवर पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी अटकपुर्व जामिन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव गेतली होती. मात्र, तत्पुर्वीच महेश झगडे यांची बदली झाल्याने या प्रकरणातील कायदेशीर गुंता व संशय दोन्हीही बळावला आहे. 

संबंधित लेख