Marathi Political News Mahesh Zagade Transfer issue | Sarkarnama

झगडे यांच्या बदलीनंतर आणखी काही सनदी अधिका-यांवर टांगती तलवार

तुषार खरात 
गुरुवार, 1 मार्च 2018

गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता राज्यातील आणखी काही सनदी अधिका-यांवरही टांगती तलवार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली.

मुंबई : गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता राज्यातील आणखी काही सनदी अधिका-यांवरही टांगती तलवार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली.

कर्तव्यकठोर असलेले अनेक सनदी अधिकारी घोटाळे बाहेर काढतात. कंत्राटे देताना गैरप्रकार होऊ देत नाहीत. स्थानिक राजकीय नेत्यांनी केलेल्या बेकायदा सुचनांकडे दुर्लक्ष करतात अशा अनेक अधिका-यांचा यात समावेश आहे. भिवंडी महानगरपालिकेचे आय़ुक्त योगेश म्हसे, पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधातही स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा सपाटा लावला असून या अधिका-यांच्या बदलीची मागणी केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आय़ुक्त नरेश गिते यांचीही नुकतीच बदली करण्यात आली. स्थानिक राजकीय पुढा-याच्या मागणीवरूनच गिते यांची बदली झाली होती. 

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदावर सुनील केंद्रेकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले होते. पण स्थानिक राजकीय नेत्यांनी केंद्रेकर यांना विरोध केल्याने एका दिवसातच ही नियुक्ती रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधातही आता स्थानिक राजकीय नेत्यांनी तक्रारींचा सपाटा लावला आहे.

स्थानिक राजकीय नेते आपल्या स्वार्थाच्या आड येणा-या सनदी अधिका-यांविषयी तक्रारी करतात. या तक्रारींच्या आधारे अधिका-यांवर बदलीची कु-हाड कोसळते. असे प्रकार वाढू लागल्याने आता अधिकारी वर्गातही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

संबंधित लेख