Marathi Political News Khamgaon Rana | Sarkarnama

खामगावात काँग्रेसकडून दोन 'राणा' विधानसभेसाठी दावेदार

श्रीधर ढगे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय केंद्रबिंदु असलेल्या खामगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून दोन 'राणा' आगामी निवडणूक लढायची तयारी करत आहेत. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि तेजेन्द्रसिंह चौहान या दोन 'राणां' मध्ये आतापासूनच चढाओढ सुरु असल्याचे दिसून येते.

खामगांव : बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय केंद्रबिंदु असलेल्या खामगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून दोन 'राणा' आगामी निवडणूक लढायची तयारी करत आहेत. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि तेजेन्द्रसिंह चौहान या दोन 'राणां' मध्ये आतापासूनच चढाओढ सुरु असल्याचे दिसून येते.

खामगाव मतदार संघ म्हणजे राज्याचे कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे 'होम ग्राउंड' असुन त्यांचे पुत्र अॅड. आकाश फुंडकर हे आता आमदार आहेत. 15 वर्ष खामगाव मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. गेल्या निवडणुकीत दिलीपकुमार सानंदा यांचा पराभव करत आकाश फुंडकर हे आमदार झाले आणि या मतदार संघात भाजपाने मजबूत पकड निर्माण केली आहे. 

बघता बघता तीन साडेतीन वर्ष निघून गेली आहेत. आणि आता नव्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांनी आता पासूनच तयारी चालविली आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार आकाश फुंडकर हेच उमेदवार राहतील, मात्र काँग्रेसकडून त्यांच्या समोर कोण उमेदवार राहिल, ही चर्चा खामगाव मतदार संघात सुरु आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी 'कहो दिलसे राणाजी फिरसे' असा नारा देत पुन्हा बिगूल फुंकला आहे. 

तर काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान यांनी सुद्धा 'हम भी दौड़ मैं...'असा नारा देवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसमधून दोन 'राणा' विधानसभेची दावेदारी करत आहेत. दोन्ही नेते वेगवेगळ्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत आहेत. 15 वर्ष बालेकिल्ला राहिलेला खामगाव मतदार संघ काबिज करण्यासाठी विधासभेच्या लढाईची धुरा पक्ष दोन पैकी कोणत्या 'राणां'कडे सोपविते हे कळायला मात्र अजून काही महिने वाट पहावी लागणार आहे.

संबंधित लेख