Marathi Political News Goa Shivsena | Sarkarnama

शिवसेनेला गोव्यात खिंडार: बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे 

अवित बगळे
शनिवार, 3 मार्च 2018

शिवसेनेने काल राज्यप्रमुखपदावरून शिवप्रसाद जोशी यांची हाकालपट्टी केल्यानंतर आज शिवसेनेला गोव्यात राज्यात खिंडार पडले. बहुसंख्य कार्यकारीणी सदस्य, तालुका सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी जोशी यांच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याचा निर्णय आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

पणजी(गोवा) : शिवसेनेने काल राज्यप्रमुखपदावरून शिवप्रसाद जोशी यांची हाकालपट्टी केल्यानंतर आज शिवसेनेला गोव्यात राज्यात खिंडार पडले. बहुसंख्य कार्यकारीणी सदस्य, तालुका सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी जोशी यांच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याचा निर्णय आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

जोशी पत्रकार परिषदेत म्हणाले, "भाजपचे काम करत असताना दोन वर्षांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी शिवसेनेचे काम पुढे न्यावे असा प्रस्ताव मांडला आणि तो स्वीकारण्यात आला. त्याचवेळी अचानकपणे हाकालपट्टी करणार नाही ना अशी विचारणा केली होती. कारण त्याआधी अजितसिंह राणे व सुदीप ताम्हणकर यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही तसा निर्णय होणार नाही असे सांगितले होते मात्र आज अचानक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हाकालपट्टी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने धक्का बसला.'' 

''शंकर परब (पेडणे तालुका प्रमुख), परीमल पंडित (बार्देश तालुका प्रमुख), आनंद मांद्रेकर (डिचोली तालुका प्रमुख), घनश्‍याम नाईक (फोंडा तालुका प्रमुख), प्रदीप नाईक (सांगे तालुका प्रमुख), ख्रिस्तानंद पेडणेकर (केपे तालुकाप्रमुख), माधव विर्डीकर (माध्यम प्रमुख), उषा नाईक ( उत्तर गोवा महिला प्रमुख), नीलेश वारखंडकर (उत्तर गोवा उपप्रमुख), संकेत चणेकर (म्हापसा शहरप्रमुख), गणी मळीक (पेडणे शहर प्रमुख), संदीप सावळ देसाई (उत्तर गोवा उपप्रमुख), रोहन सिमेपुरुषकर (कळंगुट मतदारसंघ प्रमुख), विनेश प्रभुदेसाई (कुडचडे शहर प्रमुख), रेमेडियस फर्नांडिस (ताळगाव मतदारसंघ प्रमुख) यांनी मला पदावरून हटविल्याने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

ते पुढे म्हणाले, "शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही आज बैठक आयोजित केली होती. त्याआधीच हाकालपट्टीचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगून ते म्हणाले, माझा कोणावर राग नाही. दोन वर्षात वैयक्तीत पैसे खर्च करून पक्षाचे काम चालविले, निवडणूक लढविली. माझ्याविरोधात आता आरोप होतीलही पण साऱ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणी माझ्याविरोधात बोलला म्हणून मी प्रत्युत्तर देईन असा माझा स्वभाव नाही. दोन वर्षात विधायक कामातून लोकांकडे जा, अकारण टीका करण्यात वेळ खर्ची घालू नका असाच संदेश मी कार्यकर्त्यांना दिला होता. माझ्या हकालपट्टीचा निर्णय मध्यल्या लोकांनीच निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पना असेल असे वाटत नाही. खासदार राऊत यांच्याविषयीही माझ्या मनात जराही कटूता नाही.'' 

या पत्रकार परिषदेला राजेंद्र मणेरीकर (दक्षिण गोवा उपप्रमुख), संदीप शिरवईकर (राज्य कार्यकारीणी सदस्य), दत्तप्रसाद सांगेकर (दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख), उषा नाईक देईकर (दक्षिण गोवा महिला अध्यक्ष), परिमल पंडित, विनय तळेकर (राज्य कार्यकारीणी सदस्य) उपस्थित होते.

संबंधित लेख