Marathi Political News Girish Mahajan Award | Sarkarnama

मद्याच्या ब्रँडला महिलांचे नाव द्या हे गंमतीने म्हणालो होतो : गिरीश महाजन

संपत देवगिरे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना आज नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाजन यांनी विविध वाद-विवादांविषयी मन मोकळे केले. ते म्हणाले, "लोकांसाठी काहीही करायची तयारी असते. त्यामुळे जेथे उभा राहतो तेथे कार्यालय तयार होते." 

नाशिक : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना आज नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाजन यांनी विविध वाद-विवादांविषयी मन मोकळे केले. ते म्हणाले, "लोकांसाठी काहीही करायची तयारी असते. त्यामुळे जेथे उभा राहतो तेथे कार्यालय तयार होते." 

येथील सार्वजनिक वाचनालयाचा ज्येष्ठ समाजवादी नेते माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना डॉ बंग यांनी प्रदान केला. मी बाहेरचा असुनही पालकमंत्री म्हणून नाशिकने मला स्विकारले, असे सांगत महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माझ्याभोवती सतत वाद घोंगावतात, असे सांगून ते म्हणाले, "माझा स्वभावच कशातच मागे रहायचे नाही असा आहे. त्यातुन अनेकदा ते घडते. माझा तसा हेतु नसतो. 'दारुच्या ब्रँडला महिलचे नाव द्यावे, म्हणजे तिचा खप वाढेल' हे विधान केल्याने महिलांच्या भावना दुखावल्या. वाद झाला. त्यासाठी यापूर्वीच मी माफी मागीतली आहे. मात्र खरे सांगतो, ते मी गमतीने म्हणालो होतो. मी महिलांचा आदरच करतो.'' 

ते पुढे म्हणाले, "सामान्यांच्या अडचणीत धावून जाण्यास मी नेहेमीच तयार असतो. त्यामुळे ग्रामस्थांना नरभक्षक बिबट्याचा खुपच त्रास होत असल्याचे कळले. तेव्हा क्षणाचाही विचार न करता पिस्तुल घेऊन बिबट्याच्या शोधासाठी निघालो. हेतु वाईट नव्हता. पण वाद झालाच. काही वेळा शब्द इकडेचे तिकडे होतात अन्‌ वाद होतोच.'' आपल्या वागण्यात कसलाही वेगळा हेतू नसतो. आपली किंमत कामातून वाढते यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी जिथे उभा राहतो तिथं कार्यालय सुरु होते, असेही त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापालिकेतील भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते. 

सभागृहात स्तुतीसुमने; बाहेर घोषणाबाजी
पुरस्कार वितरण सुरु असतांना सभागृहात विविध नेते मंत्री महाजनांवर स्तुतीसुमने उधळत होते. मात्र, त्याचवेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी सभागृहाबाहेर पालकमंत्र्यांनी वेळ द्यावा यासाठी निदर्शने करीत होते. अखेर महाजन यांनी त्यांना दोन दिवसांनी भेटीचे आश्‍वासन दिले. 

संबंधित लेख