Marathi Political News Farmers Long March | Sarkarnama

हजारो शेतकऱ्यांचा नाशिकहून मुंबईला 'लाँग मार्च' 

संपत देवगिरे 
मंगळवार, 6 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या रेंगाळलेल्या मागण्यांना शासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ निर्णायक लढ्यासाठी किसान सभेने कंबर कसली आहे. त्यासाठी एक लाख शेतकरी येत्या 12 मार्चला विधानभवनाला घेराव घालणार आहेत. त्यासाठी आज हजारो शेतकरी 'लाल सलाम'च्या जयजयकार करीत मुंबईकडे रवाना झाले. 

नाशिक : शेतकऱ्यांच्या रेंगाळलेल्या मागण्यांना शासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ निर्णायक लढ्यासाठी किसान सभेने कंबर कसली आहे. त्यासाठी एक लाख शेतकरी येत्या 12 मार्चला विधानभवनाला घेराव घालणार आहेत. त्यासाठी आज हजारो शेतकरी 'लाल सलाम'च्या जयजयकार करीत मुंबईकडे रवाना झाले. 

आज दुपारी येथील मध्यवर्ती बस स्थानक चौकात शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली जमले. यावेळी किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्याचे माजी अध्यक्ष आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, अर्जुन आडे, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांसह विविध नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा मोर्चा रायगडनगर (नाशिक), घाटणदेवी (इगतपुरी), कळंबगाव (शहापूर), भातसा नदी (शहापूर), मुंबई ढाबा (ठाणे), सायन/दादर (मुंबई) येथे मुक्काम करुन विधानभवनाकडे कुच करेल. 

देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या वनजमीनी शेतकरी कसतात त्या त्यांच्या नावे करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यांसह शेतक-यांचे रेंगाळलेले व प्रलंबीत प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेने या लढ्याची घोषणा केली आहे. शेतक-यांच्या या लढ्याच्या अंतर्गत किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा लाँग मार्च काढण्यात आला आहे. त्यात राज्यभरातून शेतकरी सहभागी झाले आहेत. नाशिकहून मुंबईला शेतकरी विधानसभेपर्यंत पायी जाणार आहेत. आज निघालेला हा 'लाँग मार्च' विविध मुक्काम करीत मुंबईला पोहचल्यावर विधानसभेला बेमुदत घेराव घालणार आहे. 
 

संबंधित लेख