Marathi Political News Dharma Patil Compensation | Sarkarnama

धर्मा पाटलांसह मुलाच्या खात्यात 48 लाख जमा : 'महाजनको'तर्फे सानुग्रह अनुदानाचा लाभ

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी मंत्रालयात 22 जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी सरासरी 24 लाखांप्रमाणे एकूण 48 लाखांचा निधी 'महाजनको'ने वर्ग केला. शेतकरी पिता-पुत्राला पाच एकर जमिनीच्या मोबदल्याविषयी सानुग्रह अनुदानाद्वारे हा लाभ दिला गेला. 

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी मंत्रालयात 22 जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी सरासरी 24 लाखांप्रमाणे एकूण 48 लाखांचा निधी 'महाजनको'ने वर्ग केला. शेतकरी पिता-पुत्राला पाच एकर जमिनीच्या मोबदल्याविषयी सानुग्रह अनुदानाद्वारे हा लाभ दिला गेला. 

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर 30 दिवसांत नियमानुसार न्यायदान केले जाईल, असे हमी पत्र ऊर्जामंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना दिले होते. या पार्श्‍वभूमीवर धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांना आंब्याची रोपे आणि प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानाप्रमाणे सुमारे 54 लाख 48 हजारांचा मोबदला देय होऊ शकतो. त्यात पूर्वी त्यांना एकूण चार लाख तीन हजारांचा मोबदला अदा झाल्याने तो वगळता नव्याने सुमारे 50 लाख 45 हजारांचा मोबदला देता येऊ शकेल, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता. 

त्यात 'महाजनको'ने जमिनीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून सुमारे 48 लाखांचा निधी धर्मा पाटील, नरेंद्र पाटील यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला. (कै.) धर्मा पाटील यांच्या दोंडाईचा येथील बॅंक खात्यात 24 लाखांचा निधी वर्ग करताना तो त्यांच्या वारसांना दिला जावा, अशी सूचना आहे. नरेंद्र पाटील यांच्या सुरत येथील बॅंक खात्यात 24 लाखांचा निधी वर्ग केला. 

धर्मा पाटलांची तक्रार काय?
दोंडाईचा- विखरण (ता. शिंदखेडा) परिसरात 2009 ला प्रस्तावित व नंतर रद्दबातल झालेल्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांतर्गत पाच एकरमधील भूसंपादनात आंब्याच्या झाडांचे योग्य पद्‌धतीने मूल्यांकन झाले नाही, लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र 74 आर असताना त्याला एक कोटी 89 लाखांचा मोबदला, मला फक्त चार लाखांचा मोबदला का? सरकारी यंत्रणेने अन्याय केला, असे म्हणत विखरणचे शेतकरी धर्मा पाटील (वय 80) यांनी थेट मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यात त्यांचा 28 जानेवारीला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रात्री साडेनऊला उपचार घेताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शासन, प्रशासनाचे धाबे दणाणले होते. त्यात 3 मार्चपर्यंत नियमानुसार मोबदलाप्रश्‍नी न्याय दिला जाईल, अशी हमी ऊर्जामंत्र्यांनी लेखी पत्राद्वारे नरेंद्र पाटील यांना दिली होती. 

संबंधित लेख