Marathi Political News Dhangar Reservation BJP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आरक्षणावरून भाजपमधील धनगर नेतेही बिथरले

तुषार खरात 
बुधवार, 11 एप्रिल 2018

राज्यातील भाजप सरकारला सत्तेत येवून चार वर्षे होत आली तरी धनगर आरक्षणाच्या मागणीवर ठोस हालचाली होत नाहीत. त्यामुळे धनगर आरक्षण मिळेल की नाही, याबद्दल भाजपमधीलच धनगर नेत्यांना खात्री वाटेनाशी झाली आहे. परिणामी धनगर नेते समाजाच्या जाहीर कार्यक्रमांना जायचेही टाळत असल्याचे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

मुंबई : राज्यातील भाजप सरकारला सत्तेत येवून चार वर्षे होत आली तरी धनगर आरक्षणाच्या मागणीवर ठोस हालचाली होत नाहीत. त्यामुळे धनगर आरक्षण मिळेल की नाही, याबद्दल भाजपमधीलच धनगर नेत्यांना खात्री वाटेनाशी झाली आहे. परिणामी धनगर नेते समाजाच्या जाहीर कार्यक्रमांना जायचेही टाळत असल्याचे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

जलसंधारण मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अनिल गोटे, भाजप प्रवक्ते गणेश हाके या भाजपमधील उच्चपदावर असलेल्या प्रमुख व्यक्ती आहेत. भाजपच्या आशिर्वादाने मंत्री पद मिळविलेले रासपचे महादेव जानकर, याशिवाय भाजपमधील धनगर समाजाचे वजनदार नेते बाळासाहेब गावडे, गोपीचंद पडळकर, राजू बर्गे अशा सगळ्यांवर धनगर समाज नाराज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी हे सगळे नेते आरक्षण चळवळीत आघाडीवर होते. तत्कालिन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात धनगर समाजाला भडकावून आंदोलनाला प्रवृत्त करणा-यांमध्ये यातील बहुतांश नेत्यांचा समावेश होता. 

एवढेच नव्हे तर याच पुढा-यांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांसारख्या भाजपच्या नेत्यांना धनगर आंदोलनाच्या व्यासपीठावर नेवून त्यांच्याकडून आरक्षणाचा शब्द वदवून घेतला होता. त्यामुळेच भाजपला धनगर समाजाकडून मते मिळाली. महादेव जानकर, राम शिंदे यांना मंत्रीपदाची, तर डॉ. महात्मे यांना खासदार पदाची केवळ आरक्षण चळवळीमुळे लॉटरी लागली. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता याच धनगर नेत्यांवर समाजातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. धनगर समाजाच्या राज्यभरातील विविध जाहीर कार्यक्रमांकडेही हे नेते आता फिरकत नाहीत. व्यासपीठावर भाषण करण्यास उभे राहिल्यानंतर जनतेकडून बोलू दिले जात नाही. आरक्षणाचे काय झाले असा जाहीर जाब लोकांकडून विचारण्यात येत आहे. 

जनतेमधील ही तीव्र नाराजी लक्षात घेऊन धनगर नेत्यांची पंचाईत झाली आहे. धनगर आरक्षणावर निर्णय व्हावा म्हणून हे नेते भाजपमधील वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहेत. पण आश्वासनापलिकडे कोणत्याही ठोस हालचाली होत नसल्याने धनगर नेत्यांनाही आरक्षणाबद्दल आत्मविश्वास वाटेनासा झाला आहे. सरकार आरक्षण देईल असे वाटत नाही. त्यामुळे भाजपसाठी मते मागणे सोडाच पण लोकांसमोर जाणे सुद्धा अवघड झाल्याचे हे नेते खासगीमध्ये सांगत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा लोकांमधील क्रोध आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये भाजप सरकारने आरक्षणाचा निर्णय आणखी लांबणीवर टाकणे आत्मघातकीपणाचा ठरेल, असेही मत काही धनगर नेत्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.
 

संबंधित लेख